Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले राष्ट्रवादीचे आ. नरेंद्र पाटील यांच्या घरी ‘श्रीं’चे दर्शन

नवी मुंबई, दि. 01, सप्टेंबर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल सानपाडा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते माथाडी नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र  पाटील यांच्या निवासस्थानी श्रीगणेश दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. या दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटे बंद दारा आड चर्चा झाल्याने आज शहरात नरेंद्र  पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री व माथाडी नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या वेळी आमदार  मंदा म्हात्रे, योगेश सागर, निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या  जयंतीलाही प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते. तेव्हापासून पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र पाटील यांची  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती. सानपाडा येथील कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन  घेतले. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या वेळी मुख्यमंत्री फडणवीस व नरेंद्र पाटील यांनी बंद खोलीमध्ये 20 मिनिटे चर्चा केली. यामध्ये माथाडी कामगारांच्या  प्रश्‍नांबरोबर पक्षांतराविषयी चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या भाजपने 2019 मध्ये पुन्हा एकहाती सत्ता हे एकच लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे  अगदी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून पहिल्या फळीतील पक्षश्रेष्ठी राज्यातील विविध राजकीय पक्षांतील मातब्बर नेत्यांची पक्षप्रवेशासाठी चाचपणी करत आहे.  त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांनी देखील पक्षवाढीसाठी श्रीगणेश दर्शनाचे निमित्त साधले नाही ना अशी चर्चा आहे. दरम्यान फडणवीस यांनी माजी मंत्री गणेश  नाईक यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यामुळे गेल्या वर्षापासून राजकारणातील या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या भाजप प्रवेशा बाबत ज्या चर्चा होत होत्या.  त्याला मुख्यमंत्र्यांनी श्री गणेश दर्शनाचे निमित्त साधून त्यांच्या निवासस्थानी जाण्याने अधिक बळकटी मिळाली आहे.