Breaking News

वीजचोरी, वीजगळती प्रकरणी 55 जणांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद, दि. 01, सप्टेंबर - वीजचोरी व गळतीसह थकबाकी वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम राबवून 1100 वीज चोर पकडले. यापैकी अनेकांनी  आपल्याकडे असलेली थकबाकी भरून कारवाई टाळली. तर काही ग्राहकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे अशा जवळपास 55 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आल्याची  माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात विजेची चोरी करण्यात येत आहे. या चोरीला आळा घालण्यासाठी  विशेष पथकाने चार दिवसांपूर्वीच रोशनगेट फिडरवरील वीज ग्राहकांची तपासणी करून 13 वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडीत केले. तर तीन ग्राहकांची वीजचोरी  पकडून त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. याच भागात मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या संशयावरून 14 ग्राहकांचे मीटर जप्त करून ते  तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून सदर मीटरची तपासणी होऊन आल्यावर त्याचा अहवाल येताच अशा मीटर धारकांविरूध्द कारवाई करण्यात  येणार आहे. ख्राईस्ट चर्च मुलींच्या वसतिगृहाचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. मात्र त्या ठिकाणी अनधिकृतपणे मीटर बसवून वीज पुरवठा  घेण्यात आला होता. या वस्तीगृहाकडे 23 हजार 680 रूपये थकबाकी असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला होता. सध्या त्यांनी अनधिकृतपणे मीटर बसवून 57  हजार 775 वीज यूनिट चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वीज बिल दुरुस्तीसाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी  घेण्यात येत असलेल्या दरबारात आलेल्या तक्रारीं पैकी 769 तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. या दरबारात एक हजार 77 ग्राहकांनी बिलांबाबत तक्रारी  केल्या होत्या. त्यापैकी 769 तक्रारी सोडविण्यात आल्या असून उर्वरित 308 तक्रारींचे बिल दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणने 1100 वीजचोर पकडले.