Breaking News

राष्ट्रवादीच्या आंदोलनाने महावितरण कार्यालय दणाणले

अहमदनगर, दि. 13, सप्टेंबर - शहरातील भारनियमन त्वरीत बंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चाने येवून,  महावितरणचे उप अभियंता अनिल बोरसे यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आक्रमक होवून अधिकार्यांच्या दालनातील वीज बंद केली.  तर अंधारात मेणबत्त्या पेटवून निषेध व्यक्त केला. एक तास चाललेल्या आंदोलनाने महावितरणचे कार्यालय दणानून निघाले. गुरुवार दि.14 सप्टेंबर पासून भारनियमन  पुर्णत: बंद होणार असल्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.    
आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात संजय झिंजे, उबेद शेख, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, बाबासाहेब गाडळकर, प्रकाश  भागानगरे, संभाजी पवार, अमित खामकर, साहेबान जहागीरदार, जॉय लोखंडे, मयुर विधाते, प्रा.अरविंद शिंदे, पवन भिंगारे आदिंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या  संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. महावितरण कडून तातडीचे भारनीयमन सांगून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अवेळी होणार्या भारनीयमनाने नागरिक  त्रस्त झाले असून, तातडीने भारनियमन थांबविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. लेखी दिलेल्या पत्रात राज्यातील वीज निर्मिती केंद्रांना कोळश्याच्या  उपलब्धतेसाठी अडचणी येत असल्याने राज्यासह अहमदनगर शहरात तातडीचे व तात्पुरत्या स्वरुपात भार नियमन मुख्य कार्यालयाच्या आदेशाने चालू आहे. शहरात  28 व 11 केव्ही वाहिन्यांद्वारे गटानुसार भारनियमन चालू आहे. ज्या वाहिन्या इ, फ व ग गटात येतात त्या वाहिन्यांवर आजपासून ताबडतोब कार्यवाही करण्यात  येईल. त्यामुळे सर्व वाहिन्यांचा गट ड पेक्षा खाली येवून भारनियमन कमी होण्यास मदत होईल. तसेच गुरुवार दि.14 सप्टेंबर पासून भारनियमन पुर्णत: बंद होणार  असल्याचे म्हंटले आहे.