Breaking News

17 वर्षात जिल्ह्यात 559 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

अहमदनगर, दि. 13, सप्टेंबर - नगर जिल्ह्यात 2001 पासून सप्टेंबर 2017 पर्यंत एकूण 559 शेतकर्‍यांनीं आत्महत्या केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु  त्यातील निकषात बसणार्‍या 296 शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जमाफी करूनही शेतकर्‍यांची आत्महत्या कमी होत नसल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने जनजागृती  बरोबरच शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या स्वावंलबी बनविण्याचे काम केले पाहिजे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सन 2017 मध्ये कर्जमाफी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही आत्महत्येचे प्रमाणात फारसी घट झालेली नाही. यावर्षी जून महिन्यापर्यंत 75 शेतकर्‍यांनी  आत्महत्या केलेल्या आहेत. सध्या कर्जमाफीचे अर्ज भरण्याची घाई-गर्दी सुरू असूनही नैराश्याने ग्रासलेले शेतकरी आत्महत्येपासून बाजुला जाताना दिसत नाही,असेच  दिसते. नगर जिल्ह्यात 2003 ला एका शेतकरयांनी आत्महत्या केली होती. पुढे हे प्रमाण वाढत गेले.2006 मध्ये 41, 2007 मध्ये 28,2013 मध्ये 27,2014  मध्ये 49 ,2015 मध्ये 118,2016 मध्ये 144 असे आत्महत्येच प्रमाण वाढत गेल्याचे दिसते. या आत्महत्येमध्ये छाननी करून राज्य सरकारने 296 शेतकर्‍यांनाच  आर्थिक मदत करण्यात आली आहे. उर्वरित 238 शेतकर्‍यांच्या आत्महत्या मात्र अवैध यादीत टाकण्यात आल्याचे दिसते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यभर  सरकारने जनजागृती मोहीम राबविण्याबरोबरच शेतकरी कसा आर्थिक स्वावलंबी होईल, हेच पाहणे गरजेचे आहे.