Breaking News

निंबोडी शाळा दुर्घटना प्रकरणी 4 जणांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छत कोसळून दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याप्रकरणी भिंगार  कम्प पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिकेसहीत एकूण 4 जणांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील मृत विद्यार्थिनी वैष्णवी  पोटे हिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर गुरूवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गटविकास अधिकारी वसंत गारूडकर,गट शिक्षणाधिकारी रामदास हराळ,शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला दातीर व इमारतीचे बांधकाम करणारे तत्कालीन ठेकेदार  अशी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.या प्रकरणी मृत वैष्णवी पोटे हिचे वडील प्रकाश पोटे यांनी गुरूवारी सायंकाळी जिल्हा पोलीस  अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेतली.त्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत म्हटले आहे की निंबोडी शाळेतील सदरची 5 वीच्या  वर्गाची खोली धोकादायक झालेली असल्याने या खोलीचा वापर केवळ गोडावून सारखा केला जात होता.बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर खोलीच्या भिंतींना  तडे गेले होते.त्यामुळेच या जागेत कोणताही वर्ग भरविला जात नव्हता.मात्र 15 ऑगस्टनंतर अचानकपणे विद्यार्थ्यांना पुन्हा या वर्गात बसविण्यास सुरूवात  झाली.त्यानंतर 28 ऑगस्ट(सोमवारी)रोजी सायंकाळी जोरदार पाऊस सुरू असतांना सदरच्या वर्ग खोलीचे छत कोसळून त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला तर 15  पेक्षा जास्त विद्यार्थी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यामुळे गटविकास अधिकारी वसंत गारूडकर,गट शिक्षणाधिकारी रामदास हराळ,शाळेच्या मुख्याध्यापिका  निर्मला दातीर व इमारतीचे बांधकाम करणारे तत्कालीन ठेकेदार यांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी पोटे यांनी आपल्या फिर्यादीत  केली होती.भिंगार कम्प पोलिसांनी कलम 304(अ)नुसार चार जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.