Breaking News

पुरात अडकलेल्या 31 जणांची सुटका

लष्कर व एनडीआरच्या पथकाने बजावली कामगिरी

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - बुधवारी नगर तालुक्यात दिवसभर झालेल्या जोरदार पावसाने अरणगाव येथील नदीला पूर आला, त्यामुळे तलाव फुटल्याने  नदीकाठी असलेल्या वाळुंज गावाजवळील परीट वस्तीला पाण्याने वेढा घातला. रात्री अडीच्या सुमारास लष्कर व एनडीआरच्या जवानांनी कारवाई करीत या  वस्तीवरील 31 लोकांना सुखरुप बाहेर काढले. नगर तालुक्यातील या पावसाने अनेक ठिकाणेच बंधारे भरले असून प्रशासनाने परिस्थितीवर नजर ठेवली आहे.   काल झालेल्या मुसळधार पावसाने संध्याकाळी अरणगाव येथील नदीला मोठा पूर  आला,त्यामुळे या नदीवरील तलाव फुटला. त्याचे पाणी वाळुंज येथील परीट  वस्तीजवळ पोहचले. या वस्तीवर त्यावेळी 31 लोक होते. वस्तीला पाण्याचा वेढा पडल्याने गांवकरी घाबरून गेले. स्थानिक गावकर्‍यांनीं पोलिसांना तसेच स्थानिक  पुढार्‍यांना याची माहिती दिली.जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे तातडीने धावून गेले. त्यानंतर तहसीलदार सुधीर पाटील, गटविकास अधिकारी वसंत गारूडकर  हेही घटनास्थळी पोहचले. प्रशासनाच्या हालचालीनंतर लष्कराला बोलाविण्यात आले. परंतु वस्तीजवळ जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. त्यामुळे मदत करण्यास  अडचणी येऊ लागल्या. कोणतेही वाहन तेथे पोहचत नव्हते. रात्री पुण्यावरून एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बोटीच्या  सह्याने जाऊन वस्तीवरील 15 पुरूष, 14 महिला व एक मुलगी असे 31 जणांना बोेटीतून गावाकडे सुरक्षित ठिकाणी आणले. रात्री पाणी वाढू लागल्यानंतर काही  गावकरी जिवाच्या भितीने उंच ठिकाणी तर काही झाडावर चढून  बसले. गावकर्‍यांनी लष्कर व एनडीआरएफच्या पथकाला धन्यवाद दिले आहेत.
जि.प. सदस्य कार्ले, तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी गारूडकर आदी यावेळी ठाण मांडून बसले होते. कार्ले हे तर थेट आज सकाळपर्यंत तिथेच होते.