Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30.43 लाखाचा मद्यसाठा जप्त

सावंतवाडी, दि. 06, सप्टेंबर - कोंड्ये (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे काल (दि. 4 सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर राज्य उत्पादनशुल्क खात्याने 30 लाख 43  हजाराचा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा चोरटा साठा जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. कोंड्ये येथील मद्याच्या गोदामावर धाड टाकून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. उत्पादनशुल्क विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत गोवा  बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे 503 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या मुद्देमालाची किंमत 30 लाख 42 हजार 982 रुपये एवढी आहे. सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारवाईत विशेष भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक संजय वाडेकर, दुय्यम निरीक्षक अतुल पाटील,  सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. पी. थोरात, जवान संतोष बिराजदार, श्रीपाद पाटील, तसेच वाहनचालक विक्रम परळीकर, वसंत घुगरे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक  प्रदीप वाळुंजकर आणि कोल्हापूरच्या विभागीय भरारी पथकाचा समावेश होता.