Breaking News

रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे 10 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी, दि. 06, सप्टेंबर - शिक्षक दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  प्रत्येक तालुक्यात 1 याप्रमाणे जिल्ह्यातून 9 शिक्षकांना, तर एका शिक्षकाला सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला  आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी ही नावे जाहीर केली.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून 26 शिक्षकांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी एका शिक्षकाची सेवा 15 वर्षे झाली नव्हती. त्यामुळे हा प्रस्ताव  स्वीकारण्यात आला नाही. या पुरस्काराच्या निवडीसाठी 8 जणांची समिती नेमण्यात आली होती. प्रस्तावाला 85 गुण, तर थेट मुलाखतीला 15 गुण अशी गुणांची  विभागणी करून आदर्श शिक्षक निवडण्यात आले.
तालुकानिहाय पुरस्कार विजेते शिक्षक असे - मंडणगड तालुक्यातील आदर्श शाळा लोकरवण शाळेतील पदवीधर शिक्षक मुखत्यार इस्माईल मोटलानी, दापोली  तालुक्यातील आपटी शाळेतील पदवीधर शिक्षक शशिकांत भागोजी बैकर, खेड तालुक्यातील निगडे बोरज क्र. 1 शाळेतील पदवीधर शिक्षक मंगेश मानाजी भोसले,  चिपळूण तालुक्यातील कुटरे बौद्धवाडी शाळेतील उपशिक्षिका मधुरा माधव सोहनी, गुहागर तालुक्यातील केंद्र शाळा शीर क्र. 1 मधील पदवीधर शिक्षक सुनील सदानंद  गुडेकर, संगमेश्‍वर तालुक्यातील देवळे क्र. 1 शाळेतील विषय शिक्षक राजेंद्र गंगाराम मावळणकर, रत्नागिरी तालुक्यातील कोंडखंडकर शाळेतील पदवीधर शिक्षक दीपक  तुकाराम माळी, लांजा तालुक्यातील वेरळ गायतडी शाळेतील उपशिक्षक सुदीन बाबू चव्हाण, आणि राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे सोगमवाडी मराठी शाळेतील  पदवीधर शिक्षक शैलेंद्र गजानन शिंदे. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे चिपळूण तालुक्यातील गुढे कोंडवी शाळेतील पदवीधर शिक्षक राष्ट्रपाल भागुराम  सावंत यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पाचशे रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोकणचे विभागीय आयुक्त जगदीश पाटील  यांच्यासमवेत होणार्‍या बैठकीनंतर पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.