Breaking News

जिल्ह्यात 15 सप्टेंबर रोजी रंगणार फुटबॉल फेस्टीवल

बुलडाणा, दि. 13, सप्टेंबर - जगात सर्वात जास्त लोकप्रीय असलेला सांघिक क्रीडा प्रकार म्हणजे फुटबॉल होय. या सर्वात लोकप्रीय खेळाचा 17 वर्षाखालील  खेळाडूंचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान होत असून या स्पर्धेचे 6 सामने राज्यात  होत आहे. यामध्ये एकूण 24 देशांचे संघ सहभागी होणार आहे. राज्यात स्पर्धेच्या अनुषंगाने फुटबॉल खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी फुटबॉल मिशन 1 मिलीयन  कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2017 रेाजी फुटबॉल फेस्टीवल रंगणार आहे. अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करण्यासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.
फुटबॉल फेस्टीवलची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.  याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. देशमुख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण  आदी उपस्थितहोते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या शाळा व  वसतीगृह तयारीला लागले आहे. फुटबॉलचे सामने 15 सप्टेंबर 2017 रोजी होणार असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी   पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 587 शाळा या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. तसेच स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या 287  शाळांना प्रत्येकी तीन फुटबॉल, तर शाळा नोंदणी न केलेल्या शाळांना प्रत्येकी 2 फुटबॉल देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात या फेस्टीवलमध्ये 30 महाविद्यालये,  न.पच्या 8 शाळा सहभागी होणार असून 720 ठिकाणच्या मैदानांवर फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने आयोजित केल्या जाणार आहे. फुटबॉल खेळाला प्रोत्साहन  मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने पाच ठिकाणी विशेष सेल्फी पॉईंटची उभारणी केली आहे. त्यामध्ये शेगांव येथील आंनद सागर प्रवेशद्वार,  नांदुरा येथील हनुमान मुर्तीजवळ, लोणार सरोवराजवळ, सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्याजवळ आणि हिवरा आश्रम येथील विवेकानंद  नगर या ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात किमान 50 हजार खेळाडू एकाच दिवशी फुटबॉल खेळतील याबाबत प्रयत्न सुरू आहेत. फुटबॉल फेस्टीवलमध्ये 30 बाय  20 मीटर प्रमाणे मैदान आखणी करण्यात येणार असून 15 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 8 ते 12 सामने खेळविले जातील. प्लॅस्टीक कोन, विटा आदी साहित्य  वापरून गोलपोस्ट तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक सामना हा 30 मिनीटांचा असणार आहे. मध्ये 5 मिनीटांचा ब्रेक असणार आहे. एका संघात पाच खेळाडू  राहतील. तसेच दोन खेळाडू राखीव असतील. एकापेक्षा जास्त संघ असतील तेथे संघ क्रमांक ठरवून देण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हा क्रीडा अधिकारी  यांनी दिली.