Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात 36 हजार 378 गणपतींचे विसर्जन

रत्नागिरी, दि. 06, सप्टेंबर - अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 64 मूर्तींसह एकंदर 36 हजार 378 गणेशमूर्तींचे  विसर्जन झाले.
जिल्ह्यात 111 सार्वजनिक आणि एक लाख 67 हजार 866 गणपतींचे पूजन गणेश चतुर्थीच्या दिवशी झाले. दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन  शांततेत झाले. सर्वाधिक एक लाख 16 हजार 28 घरगुती आणि 17 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन गौरीच्या बरोबर सातव्या दिवशी झाले. त्याखालोखाल आज  अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ठिकठिकाणच्या विसर्जनाच्या मिरवणुकांना सायंकाळी प्रारंभ झाला. रत्नागिरीत पांढरा समुद्र येथे  नगरपालिकेने विसर्जनासाठी उत्तम व्यवस्था ठेवली होती. निर्माल्य संकलित करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्वनिप्रदूषण  रोखण्यासाठी आणि निर्माल्य संकलित करण्यासाठी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते समुद्र, तळी, नद्या आणि विहिरींवर प्रबोधनासाठी उपस्थित होते. रात्री दहा  वाजण्यापूर्वी विसर्जन पूर्ण होण्यासाठी पोलीस यंत्रणेने आखणी केली होती. ती सफल झाली. जिल्ह्यातल्या दहा सार्वजनिक आणि 9 खासगी मूर्तींचे विसर्जन उद्या  होणार असून आणखी 59 घरगुती गणपतींचे पूजन एकविसाव्या दिवसापर्यंत होणार आहे.