औरंगाबादेतही वेणी कापण्याचे लोण
औरंगाबाद, दि. 23, ऑगस्ट - उत्तर भारतातील वेणी कापण्याचे लोण औरंगाबादेत पोहोचले असून काल रात्री वेणी कापल्याची दुसरी घटना घडली. काल रात्री जहाँगीर कॉलनीत शेख मोहंमद यांचे कुटुंबिय रोजच्या प्रमाणे झोपले हो.ते रात्री अकरा वाजता त्यांच्या मुलीची वेणी कापल्याचे लक्षात आले. आपले केस कापलेले दिसताच मुलगी घाबरून घामाघुम झाली. तिचे हात पाय थरथरु लागले. तिला घाटी रूग्णालयात उपचारासाठी न्यावे लागले. कुटुंबालाही हा मोठा धक्का होता. या घटनेची मुलीच्या पित्याने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तातडीने घरची पाहणी केली असून घरची दारं खिडक्या बंद असताना ही घटना कशी घडली हा प्रश्न पडला आहे.या आधी गेल्या आठवडयात छावणी बाजारात भाजी आणण्यासाठी गेलेल्या खानावळ चालक महिलेची वेणी कापली गेली होती.