Breaking News

जायकवाडी धरणातील जलसाठ्याने ओलांडली साठी

औरंगाबाद, दि. 23, ऑगस्ट - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसाने मराठवाड्यातील धरणात पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी  धरणातील जलसाठ्याची टक्केवारी मंगळवारी 60 .19 टक्क्यांवर पोहचली असून, नाशिककडील धरणातून पाणी विसर्ग सुरू असल्यामुळे जलसाठा झपाट्याने  वाढत आहे. समाधानकारक पाऊस पडलेल्या जिल्ह्यातील काही धरणात पाणीसाठा वाढल्याने सिंचनाचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता आहे. दीड महिन्याच्या  खंडानंतर मराठवाड्यात पावसाचे आगमन झाले आहे. उर्ध्व भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. नांदूर  मधमेश्‍वर धरणातून 32 हजार 690 क्यूसेक, नागमठाण धरणातून 14 हजार 480 क्यूसेक, गंगापूर धरणातून पाच हजार 982 क्यूसेक, दारणा धरणातून  तीन हजार 383 क्यूसेक आणि मूळा-प्रवरा प्रकल्पातून सात हजार 942 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.