Breaking News

शिरपूर पॅटर्नसाठी युवा शेतकर्‍यांची गरज - सुरेश खानापूरकर

अहमदनगर, दि. 08 - गावातील ओढ्यांच्या खोलीकरणाचा मार्ग असणारा शिरपूर पॅटर्न प्रत्येक गावांत राबविण्यासाठी युवा शेतकर्‍यांनी पुढाकार घेतल्यास संपूर्ण गावाला जलसंजीवनी मिळेल. मात्र यासाठी  युवा शेतकर्‍यांच्या सहकार्याची गरज असून असे झाल्यास या तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल, असा विश्‍वास प्रसिद्ध शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केला. 
पारनेर तालुक्यातील सुपा, राळेगणसिद्धीसह विविध भागांत खानापूरकर यांनी शेतकर्‍यांशी संपर्क साधला. महा ई सेवा केंद्राचे तालुका समन्वयक पुरूषोत्तम सोमवंशी अध्यक्षस्थानी होते़. खानापुरकर यांनी शेतक-यांनी संवाद साधताना शिरपुर पॅटर्नअंतर्गत धुळे जिल्हयात सुमारे 55 गावांमध्ये उन्हाळयातही मोठया प्रमाणावर बंधारे पाण्याने वाहत असल्याचे सांगून तेथील चित्रीकरणही शेतक-यांना दाखविले. ग़ावातील छोटया ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास त्यात मोठया प्रमाणावर पाणीसाठा साठेल आणि त्यातून शेतक-यांना विहीरी व बोअरमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, असा विश्‍वास खानापुरकर यांनी व्यक्त केला़.  जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, की खानापूरकर यांच्या शिरपूर  पॅटर्नअंतर्गत नगर जिल्यात सुमारे तीस ठिकाणी कामे सुरू आहेत. सुपा येथील सरपंच विजय पवार यांनी सुपा येथे शिरपुर पॅटर्नचा प्रयोग राबवण्यासाठी आम्ही शिरपूरचा दौरा करणार असल्याचे सांगितले. यावेळी जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष अनिल मोहिते, सरपंच विजय पवार, राजेंद्र ढवळे, सचिन काळे, एकनाथ भालेकर, वैभव पठारे, अमोल मैड, कानिफनाथ गायकवाड आदींसह स्थानिक शेतकरी  मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होेते़.