Breaking News

खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

अहमदनगर, दि. 08 - लहान मुलांच्या भांडणावरून कारणावरून झालेल्या हाणामारीत दोघांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभी श्री देव यांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि वेगवेगळ्या कलमानवये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. त्यांना वकील भाबल यांनी सहकार्य केले. सुरेश रंगनाथ शिंदे व त्याची पत्नी सविता सुरेश शिंदे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. 
पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथे दि.28 जून 2016 रोजी लहान मुलांची भांडणे झाली होती. यावेळी शिवाजी दिनकर शिंदे आणि त्याची आई वत्सला दिनकर शिंदे व रेश्मा शिवाजी शिंदे यांना मारहाण झाली होती. या घटनेनंतर पुन्हा दि. 30 जून रोजी भांडणे झाली. शिवाजी शिंदे व त्याची आई वत्सला हे दोघे सुरेश शिंदे याच्या घरासमोरून जात असताना त्याने वत्सला शिंदे याना शिवीगाळ केली. तसेच कुर्‍हाडीने मारहाण केली व सविता शिंदे हिने काठीने मारहाण केली. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून दिनकर शिंदे व शिवाजी शिंदे बाहेर आले. त्यावेळी सुरेश शिंदे याने दिनकर शिंदे यांच्या डोक्यात कुर्‍हाड घातली व दुसर्‍यास मारहाण केली. घटनास्थळो बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यापैकी एकाने जखमींना सूप येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमींना उपचारार्थ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यावेळी जखमी दिनकर शिंदे मयत असल्याचे डॉटरांनी घोषित केले. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले.  न्यायालयाने आरोपीना दोषी धरून भादंवि 302 अन्वये आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकाला 25 हजार रुपये दंड, भादंवि 307 अन्वये 10 हजार रुपये दंड, भादंवि 504 प्रमाणे 1 वर्ष सक्तमजुरी अशा शिक्षा सुनावल्या.