Breaking News

पत्रकारांची विश्वासर्हता पणाला लागल्याचे चित्र - निरगुडकर


औरंगाबाद,दि.8 : अलीकडच्या काळात पत्रकारांची विश्र्वसनीयता पणाला लागली आहे. पत्रकारांना प्रश्नच पडत नाही हाच खरा प्रश्न असून आपली मते दुसऱ्यांवर थोपवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर कोणत्याही परिस्थितीत करायलाच हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी येथे केले. एमजीएम मधील आर्यभट्ट सभागृहात ""इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जबाबदार पत्रकार'' या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी ते बोलत होते. निरगुडकर म्हणााले, हल्ली पत्रकारिता करणे खूपच कठीण झाले आहे. जाहिराती की बातम्या या कात्रीत हा व्यवसाय अडकला आहे. 25 ते 30 रुपये खर्च झालेले वर्तमानपत्र 3 रुपयात विकले जाते. जाहिरात आणि बातम्यांचा समतोल साधूनच या व्यवसायात तग धरता येते. ते म्हणाले, वाचन आणि तिन्ही भाषांतर प्रभुत्व असणे प्रत्येक प्रत्रकारासाठी आवश्यक असते. पत्रकारितेत कुठल्याही विषयाला पर्याय मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक विषयाला समजून घेणे पत्रकारांसाठी आवश्यक ठरते. इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता असलेले या क्षेत्रात टिकून राहतात. लाकूड प्रत्येक जण पाहतो. परंतु, जो लाकडाच्या घर्षणाने निर्माण होणारा अग्नी पाहतो तोच खरा पत्रकार होऊ शकतो असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचा तास झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. याप्रसंगी व्यासपीठावर एमजीएमचे संस्थेचे विश्र्वस्त अंकुशराव कदम, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. डॉ. आशा देशपांडे, प्रा. डॉ विशाखा गारखेडकर त्याचबरोबर विविध वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन हिमांशु देशमुख याने केले.