Breaking News

राहुल गांधी यांनी सुरक्षा नियमांचे पालन केले नाही - राजनाथ सिंग

नवी दिल्ली, दि. 08, ऑगस्ट - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौ-यावर असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. मात्र त्यांनी सुरक्षा नियमांचे  पालन केले नाही. ते बसलेली गाडी बुलेटप्रुफही नव्हती, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज संसदेत दिली. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या  हल्ल्याच्या मुद्यावर संसदेत गदारोळ झाला. त्यावर सिंग यांनी सभागृहात निवेदन केले.
राहुल गांधी यांना विशेष संरक्षण पथकाचे संरक्षण असतानाही ते अनेकदा त्यातून बाहेर येत होते. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून एका व्यक्तीला ताब्यात  घेतले आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. राहुल यांना गुजरातमध्ये अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली होती . राज्य सरकारने सुरक्षा पुरवण्यात कोणतीही  कसूर ठेवली नव्हती . या हल्ल्यासंदर्भात तातडीने कारवाई करत एकाला अटक करण्यात आली. राहुल गांधी यांच्या सुरक्षा पुरवण्यात कोणतीही कमतरता ठेवली  जाणार नाही, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.