Breaking News

नागपुरातील मूर्तींना परदेशात मागणी; भक्ताचे बाप्पा जुलैतच झाले एक्स्पोर्ट

नागपूर, दि. 08, ऑगस्ट - नागपुरातील चितारओळ ही मातीच्या मूर्तींची विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इथल्या सुबक, सुंदर मूर्तींचा लौकिक आता  सातासमुद्रापार गेला असून परदेशात या मूर्तीना मोठी मागणी असल्याची माहिती स्थानिक मूर्तिकार राजेश चौरसिया यांनी दिली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की,  गेल्या 20 वर्षात जागतिकीकरणामुळे अनेक स्थानिक लोक परदेशात स्थायिक झालेत. हे लोक परदेशातही मोठया भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी  खास नागपुरातून गणेशमूर्ती देखील बोलावतात. परदेशातून येणार्‍या मूर्तीच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच मूर्ती बनवण्यास प्रारंभ होतो. विशेष  म्हणजे या मूर्ती तयार होऊन जुलै महिन्यातच परदेशात निर्यात देखील करण्यात आल्याचे चौरसिया यांनी सांगितले.
भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे आगमन अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्‍वभूमीवर चितारओळीतील मूर्तिकारदेखील मूर्ती बनविण्यात मग्न  झाले आहेत. परंतु मूर्ती कुठल्या मातीपासून बनतात आणि माती कुठून आणली जाते, याबाबत अनेकांना माहितीच नाही. याबाबत माहिती देताना चौरसिया म्हणाले  की, चितारओळीत बनविण्यात येणार्या सर्व लहान मूर्ती या लाल मातीपासून बनविल्या जात असून, ही लाल माती भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव व चंद्रपूर भद्रावती  या ठिकाणाहून आणली जाते. भंडारा जिल्ह्यात लाल मातीचे प्रमाण अधिक असल्याने तसेच मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने या लाल मातीचा वापर मूर्ती  बनविण्यासाठी करतात. तर मोठया मूर्तींसाठी काळ्या व पिवळ्या मातीचा वापर करतात. काळी माती शहरातच उपलब्ध असून, जेथे खोदकाम सुरू असते अशा  ठिकाणाहून माती आणली जात असल्याचे चौरिया यांनी सांगितले.
अवघ्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी डिसेंबर महिन्याच्या शेवटी पासूनच सुरू होते. डिसेंबर महिन्यातच माती मागविली जाते. माती आल्यानंतर येथील  मजूर माती गाळून घेतात. त्यानंतर ती माती भिजविली जाते. ज्याप्रमाण मडके घडविताना कुंभार माती एकजीव करतो, त्याचप्रमाणे येथील कारागीरदेखील माती  एकजीव करून घेतात. मोठया मूर्ती बनविण्यासाठी माती एकजीव करताना त्यामध्ये गव्हांडा व तणस टाकून एकत्र केल्या जाते. त्यानंतर मूर्ती घडविली जाते. माती  एकजीव करणार्या कारागिरांना एक दिवसाची रोजी 300 रुपये एवढी असते. एक मूर्ती घडविताना वेगवेगळी कामे करणार्या सुमारे 3 ते 4 कारागिरांची गरज भासते. या  सर्व कारागिरांची मजुरीदेखील वेगळी असते. देशाबाहेर व इतर राज्यात राहणार्या नागपूरच्या लोकांसाठी मूर्ती आधीच उपलब्ध व्हावी यासाठी मूर्ती बनविण्याचे काम  फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच तयार करण्याचे काम सुरू केले जाते. गणपतीच्या आधी श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आधी कृष्णाच्या मूर्ती व त्यासोबतच गणेशमूर्ती  व दुर्गादेवीच्या मूर्तीचे काम देखील सुरू केले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटीमुळे एका मूर्तीमागे सुमारे सुमारे 80 रुपये वाढले असल्याचे चौरसिया यांनी  सांगितले.