Breaking News

एसटी कर्मचारी दिवाळीआधी संपावर जाणार

औरंगाबाद, दि. 29, ऑगस्ट - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना राज्य शासनाच्या कर्मचा-याचा दर्जा देऊन सातव्या वेतन आयोगानुसार  वेतनवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले असून, येत्या दिवाळी सणाच्या आठ दिवस अगोदर संप पुकारणार असल्याचा निर्णय घेण्यात  आला आहे, अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव राजेंंद्र मोटे यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणीची  बैठक पार पडली. बैठकीत एसटी कर्मचा-यांच्या वेतनवाढीवर चर्चा करण्यात आली. एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यभर संप करावा  की नाही यासाठी एसटी कर्मचारी संघटनेने मतदान घेतले होते. त्यावेळी कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मतदान केले होते. कर्मचा-यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी  दिवाळी सणाच्या आठ दिवस अगोदर राज्यातील एसटीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.