Breaking News

गंगापूरमधील मांसविक्री गणेश विसर्जनापर्यंत बंद ठेवण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय

औरंगाबाद, दि. 29, ऑगस्ट - गंगापूर शहरातील मांसविक्री गणपती विसर्जनापर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थानिक कुरेशी समाजाने घेतला आहे. समाजाने  सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे पाहावयास मिळत आहे. गंगापूर येथील पोलीस स्थानक परिसरात आयोजित कुरेशी समाजाच्या बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी प्रास्ताविकामध्ये शहरात शांतता परस्पर सौहार्द कायम राहण्यासाठी आवश्यक असलेल्या  गोष्टींसाठी सर्व समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उपस्थित कुरेशी समाजाच्या पदाधिकारी सदस्यांनी अनुकूल प्रतिसाद देत 27 ऑगस्ट ते  सप्टेंबर या गणेशोत्सव काळामध्ये कुठल्याही प्रकारचे मांसविक्री करण्यात येणार नसल्याचे आश्‍वासन देत सामाजिक सौहार्द भाईचारा कायम ठेवण्यासाठी कायम  सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. या वेळी सुलेमान मामू कुरेशी, हाजी गणी कुरेशी, मुनाफ कुरेशी, इलियास कुरेशी, आलिम कुरेशी, वाजेद कुरेशी, अनिस बाबा  कुरेशी, मोहसीन कुरेशी यांची उपस्थिती होती.