रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात
मुंबई : देशातील महागाईचा दर कमी झाल्याने रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलन विषयक धोरण समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हा दर आता 6.25 वरून 6 टक्क्यांवर आला आहे.
तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के पर्यंत आणण्यात आले आहेत. गेल्या 7 वर्षातील हा निच्चांक आहे. यासोबतच गृहकर्ज आणि इतर कर्जांवरील ईएमआय स्वस्त होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बँकांनी व्याजदर कमी केल्यास आपल्या घर आणि कारवर बचत होण्याची शक्यता आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांनी बँकांना कर्ज स्वस्त करण्याचे आवाहन केले आहे. सध्या बँकांच्या तिजोरीत आवश्यक एवढी रोख रक्कम आहे. त्यावरून बँका आपले कर्ज स्वस्त करू शकतात असे पटेल म्हणाले आहेत. पतधोरण जाहीर करताना उर्जित पटेल म्हणाले, येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रसह इतर राज्यांनी शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा केली. तसेच जीएसटीची अंमलबजावणी सुरू असल्याने 2018 च्या शेवटपर्यंत महागाई 4 टक्के पर्यंत वाढणार आहे.