Breaking News

कर्नाटकातील छाप्यावरून संसदेत गदारोळ




छापेमारीचा राज्यसभा निवडणुकीशी संबंध नसल्याचे जेटली यांचे स्पष्टीकरण 
कर्नाटकच्या ऊर्जामंत्र्यांच्या घरासोबत 39 ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी  
लोकशाहीची हत्या थांबवा, हुकूमशाही चालणार नाही : काँग्रेस खासदारांच्या घोषणा 
नवी दिल्ली :
गुजरात काँगे्रसचे 44 आमदार  कर्नाटकात थांबलेल्या रिसॉर्टवर आयकर विभागाने बुधवारी सकाळी छापे टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्याचे पडसाद संसदेत पहायला मिळाले. या छापेमारीचा संबध राज्यसभा निवडणूकीशी असल्याचा आरोप काँगे्रसन संसदेत केला. या छापेमारीत भाजपाचा हात असून, काँगे्रसच्या आमदारांना घाबरवण्यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचा आरोप काँगे्रसने केला. राज्यसभेतील एका जागेसाठी भाजपने हा खटाटोप केला. पण भाजप त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होणार नाही असे मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले. मात्र या छापेमारीचा संबध राज्यसभा निवडणूकीसोबत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत दिले.
कर्नाटकमधील ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांचे घर आणि ईगलटोन गोल्फ रिसॉर्टसहित 39 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात 5 कोटी एवढी रोख रक्कम जप्त करण्यात आली. शिवकुमार यांच्या मालकीचे असलेल्या या रिसॉर्टमध्ये काँग्रेसचे गुजरातमधील 44 आमदार वास्तव्यास होते. त्यांना या रिसॉर्टमध्ये लपवून ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. छाप्यादरम्यान रिसॉर्टमधील सर्व खोल्यांची तपासणी करण्यात आली. भारतीय जनता पक्ष सत्तेचा वापर करून गुजरातमधील आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे , असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, आयकर विभागाने या कारवाईचा आणि गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीचा काहीच संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. शिवकुमार यांच्या मालमत्तेबाबत माहिती मिळाल्याने हे छापे टाकण्यात आले आहेत असे आयकर विभागाने म्हटले आहे.



प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग : अहमद पटेल
कर्नाटकमधील मंत्र्याच्या निवासस्थानावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडी हा प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुजरातमधून पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मला पराभूत करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबल्या जात आहेत, असेही पटेल म्हणाले.


विरोधी पक्षांचे खच्चीकरणांचा डाव : शर्मा 
कर्नाटकातील छाप्यानंतर काँगे्रसचे खासदार संसदेतही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले असून, लोकशाहीची हत्या थांबवा, हुकूमशाही चालणार नाही,
अशा घोषणा उपसभापती पीजे कुरियन यांच्या आसनासमोर येऊन काँगे्रसच्या खासदारांनी दिल्या. सरकारी यंत्रणेचा वापर विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यासाठी केला जात आहे. सीबीआय, आयकर आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी सुरू असून, आयकर विभागाच्या छाप्याची वेळ आणि स्थान यावरही  आनंद शर्मा यांनी टीका केली.