Breaking News

पुणे महापालिकेचा विश्‍वविक्रमी ढोल वादन कार्यक्रम रद्द

पिंपरी, दि. 28, ऑगस्ट - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिका आणि ढोल ताशा महासंघ यांच्यावतीने बालेवाडी येथे रविवारी विश्‍वविक्रमी  ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गिनीज बुक ऑफ वर्ल्डची वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या दहाव्या  दिवशी म्हणजे तीन सप्टेंबर रोजी हा उपक्रम करण्यास आणि गिनीज बुकची वेळ घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर  यांनी सांगितले.सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण या नावाखाली शतकोत्तर रौप्य महोत्सवी महोत्सव साजरा करणार्‍या महापालिकेचा विश्‍वविक्रमी ढोल वादन  कार्यक्रम एकाच आठडयात सलग दुसर्‍या वेळी रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. आधी 23 ऑगस्ट रोजी शहरात या कार्यक्रमास पोलिसांकडून मनाई  करण्यात आल्यानंतर बालेवाडी येथे महापालिकेने रविवारी हा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, त्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या आवश्यक परवानग्या न  मिळाल्याने हा कार्यक्रम आता अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.