Breaking News

दीड दिवसांचा श्रीगणेश मूर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न

नवी मुंबई, दि. 28, ऑगस्ट - गणपती बाप्पा मोरया या नामगजरात आगमन झालेल्या श्रीगणरायाचे दीड दिवसानंतर होणारे मुर्तीविसर्जन नवी मुंबई महानगरपालिका  क्षेत्रातील 23 मुख्य विसर्जन स्थळांवर सुव्यवस्थित रितीने पार पडले. महानगरपालिकेच्या वतीने सर्वच ठिकाणी चोख स्वरुपाची विसर्जन व्यवस्था करण्यात आली  होती.
महापालिका क्षेत्रातील 23 विसर्जन स्थळांवर 8418 घरगुती व 22 सार्वजनिक अशा दीड दिवसांच्या 8440 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये बेलापूर  विभागात 5 विसर्जन स्थळांवर 2008 घरगुती व 06 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 1501 घरगुती व 2 सार्वजनिक, वाशी विभागातील 3  विसर्जन स्थळांवर 1395 घरगुती, तुर्भे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 210 घरगुती व 2 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 1324 घरगुती,  घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 811 घरगुती व 4 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 941 घरगुती व 8 सार्वजनिक आणि दिघा विभागात  1 विसर्जन स्थळावर 228 घरगुती अशा एकुण 8418 घरगुती व 22 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 8440 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात  आले.
नवी मुंबईतील मुख्य 14 तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल पध्दतीची रचना करण्यात आली असून भक्तजनांनी त्याच विशिष्ट क्षेत्रात श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून  पर्यावरण संरक्षण - संवर्धन कार्यात आपला उत्स्फुर्त सहभाग दाखविला. सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. त्याचप्रमाणे  संबंधित विभागाचे सहा. आयुक्त - विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विसर्जनस्थळी लाईफगार्डस्, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दलही कार्यरत होते.  तराफ्यांसह आवश्यक त्याठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था तसेच प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.  याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात  आली आहे. हे प्रसाद साहित्य व फळे गरजू नागरिकांना वितरित करण्यात येत आहे. स्वतंत्र वाहनाव्दारे दररोज निर्माल्याची वाहतुक करण्यात येणार असून  निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यावर्षी काही विसर्जन स्थळांवर  श्रीमूर्तींची आरती व पूजा करण्यासाठी सेतू डव्हर्टाझिंग यांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील विसर्जन किऑक्स उभारण्यात आले आहेत.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत असून सर्व बाबींवर करडी नजर ठेवली जात आहे. विसर्जनस्थळांवर  महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून व्यासपीठ उभारण्यात आले असून त्याठिकाणी स्वागत व सूचनांसाठी ध्वनीक्षेपक व्यवस्था करण्यात आलेली  आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त शहर श्री. अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उप आयुक्त  दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 चे उप आयुक्त अंबरिश पटनिगिरे आणि सर्व विभागांचे सहा. आयुक्त - विभाग अधिकारी हे त्यांच्या अधिकारी-कर्मचा-यांसह  संबंधीत पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या सहयोगाने यापुढील काळातील श्रीगणेश विसर्जन या पध्दतीनेच सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी सज्ज असणार आहेत