Breaking News

परळी बसस्थानकाला लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान

बीड, दि. 28, ऑगस्ट -  शनिवारी मध्यरात्री दोन वाजताचारास परळी बस स्थानकावरील वितरण विभागात भीषण आग लागली. या आगीत सुमारे 35  लाखांचा ऐवज जळून खाक झाला. मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीमुळे परळी आगाराची एकही बस रस्त्यावर आज धावू शकली नाही  त्यामुळे प्रवाशांंची चांगलीच गैरसोय झाली.याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री परळी आगारातील वितरण विभागाला अचानक आग लागली.  सुरूवातीला आग लागल्याचे बराच वेळ लक्षात न आल्याने या आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण करून वितरण विभाग पूर्णपणे कवेत घेतला. या आगीमध्ये वितरण  विभागातील तिकीटाच्या 150 मशीन, चालक वाहकांचे गणवेश, बॅच, सामानाच्या पेट्या, कॅशबुक आदी जवळपास 35 लाखांचा ऐवज जळून खाक झाला आहे. या  घटनेचा बस वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून परळी डेपोची एकही बस बाहेर पडू शकली नाही. मात्र, बाहेरच्या डेपोंच्या बसची आवक जावक सुरू आहे.