Breaking News

वाक्चौरे, भांगरे, नाईकवाडींची जिल्हा नियोजन समितीवर निवड

अकोले, दि. 24 - जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीसाठी झालेल्या निवडणूकीत अकोले तालुक्यातील तीन भूमीपुत्रांचा दणदणीत विजय झाला असून यामध्ये  जिल्हा परिषद प्रवर्गातून भाजपाचे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जालिंदर वाकचौरे, महिला प्रवर्ग सौ. सुनिता भांगरे तर अकोले नगरपंचायतीच्या भाजपाच्या  नगरसेविका सोनाली चेतन नाईकवाडी (नगरपंचायत खुला गट) यामधून या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या निवडीचे अकोले शहर, आढळा, मुळा, प्रवरा व  आदिवासी भागात कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले.
जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी एकूण 8 जागा निर्धारित होत्या. यामध्ये काँग्रेसचे राजेश परजणे, भाजपचे जालिंदर वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावती  ढाकणे, हर्षदा काकडे, सुधाकर दंडावते हे विजयी झाले.
नगरपंचायत मतदार संघातून खुल्या गटात एका महिलेसाठी आरक्षित असणार्‍या जागेवर सोनाली नाईकवाडी या विजयी झाल्या. महिला सर्वसाधारण प्रवर्गातील 9  जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपाच्या सुनिता भांगरे या विजयी झाल्या. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव  भांगरे, शिवाजीराव धुमाळ, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे आदींनी अभिनंदन केले.