Breaking News

सातारा शहरात डॉल्बीवर बंदी

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डॉल्बी वाजू न देण्याचा निर्धार सातारा शहर पोलिसांनी केला आहे. या कालावधीत शहरात डॉल्बीला नो  एन्ट्री असणार आहे. त्यासाठी शहरात प्रवेश करणार्‍या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख  संदीप पाटील यांनी केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी गणेशोत्सव मंडळ, डॉल्बीचालक व मालकांना मिरवणुकांमध्ये डॉल्बी न वाजवण्याचे  आवाहन करत आहेत. कायद्याचा धाकही त्यासाठी काही वेळा दाखवला जात आहे. पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी बैठका घेऊन डॉल्बी न वाजविण्याचे आवाहन  केले आहे. त्यातूनही कोणी डॉल्बी आणायची म्हटली तर शहरात प्रवेश करु द्यायचा नाही. यासाठी पोलीस तैनात करण्यात येणार आहे. मिरवणुकीपूर्वी काही दिवस  शहरात नाकाबंदी करणार आहे.