Breaking News

मैदानावर घाम गाळणे ही सर्वात मोठी आरोग्यसाधना- डॉ. मालपाणी

संगमनेर दि. 24  (प्रतिनिधी) :- तासनतास व्हीडीओ गेम खेळण्याच्या आहारी जाऊन आरोग्याचे मोठे नुकसान होते. त्यापेक्षा मैदानावर घाम गाळा. आरोग्यमय  जीवन देणारी ही सर्वात मोठी साधना आहे. असे प्रतिपादन डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
ओकिनावा मार्शल आर्टस आणि गीता परिवार यांच्या वतीने मालपाणी विद्यालयातील शारदा खुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लक बेल्ट प्रदान  समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कराटेतज्ज्ञ सुरेश जाधव, गीता परिवार संगमनेर शाखाध्यक्ष सतीश इटप ,पालक प्रतिनिधी  अनिरुद्ध उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘ तरुण पिढीने सोशल मिडियाच्या अती आहारी जाता कामा नये. व्हाटस अप, फेसबुक, यु ट्यूब यामुळे आरोग्याला घातक ठरणारी बैठी जीवनशैली येऊ पहात  आहे. तिला अटकाव केला पाहिजे. ब्ल्यू व्हेल सारखे गेम अनर्थ घडवीत आहेत. सतत आभासी जगात वावरल्याने नैराश्य येते. या सर्वावर मात करण्यासाठी  शारीरिक परिश्रम करायला लावणारे मैदानी खेळ खेळा.
सुदृढ शरीरामुळे कणखर मानसिकता येते आणि जीवनातील अडचणींवर मात करणे शक्य होते. या दृष्टीने कराटेचे महत्व अनन्यसाधारण आहे. क्षमता, बुद्धिमत्ता,  आणि शक्ती यांना विवेकाची जोड देणारा हा क्रीडाप्रकार आहे. येथील नऊ मुलीही ब्लक बेल्ट झाल्या ही अभिमानाची बाब आहे. या ‘नवदुर्गां’नी इतर मुलींना स्व  संरक्षणार्थ ही कला शिकवावी. असे डॉ. मालपाणी म्हणाले.
यावेळी कराटे तज्ज्ञ सुरेश जाधव यांच्या हस्ते 29 प्रशिक्षणार्थींना ब्लक बेल्ट व प्रशस्तीपत्रके  प्रदान करण्यात आली.
डॉ. ललितबिहारी जोशी, प्रांजली ताम्हाणे, मुग्धा उपासनी, सई गायकवाड या प्रशिक्षणार्थीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्लकबेल्ट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी कराटेची  थरारक प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा गजर करून त्यांचे कौतुक केले.
यावेळी श्री. जाधव यांनी संगमनेरमध्ये गीता परिवाराने कराटे प्रशिक्षणात चोवीस वर्षे सातत्य राखून गुणवत्तापूर्ण विस्तार केल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. कमतरता  कधीही झाकून ठेवू नका ते उघडी पडते. कमतरता दूर करण्यासाठी झटा. गीता परिवाराने दिलेली संस्कारांची पणती सर्वांच्या आयुष्याचा मार्ग प्रकाशमान करणारी  आहे. एका प्रशिक्षण केंद्रापासून संगमनेरात झालेली सुरुवात आज सात वर्गापर्यंत पोहचली आहे. मार्शल आर्टसचा संगमनेरात झालेला विस्तार हे संजय मालपाणी  यांच्या दूरदृष्टीचे आणि येथील कराटे प्रशिक्षकांच्या मेहनतीचे फळ आहे. असे श्री जाधव म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कराटे प्रशिक्षक दत्ता भांदुर्गे यांनी केले.सूत्रसंचालन सचिन पलोड यांनी केले. आभारप्रदर्शन सतीश इटप यांनी केले.