Breaking News

गणनायक : न्यायी मानव...!


हिंदु बहुजन समाजाने आपली संस्कृती स
मजून घेतांना त्यातील महोत्सव देखिल समजून घ्यायला हवेत. आमच्या बहुजन हिंदु संस्कृतिला ब्राह्मणांनी त्यांच्या संस्कृतित विलिन करण्याचा प्रयत्न वारंवार केला. आमच्या इतिहासातील अनेक वास्तव बाबी आणि दंतकथेतुन असणारा इतिहास याला विकृत करण्याचे काम त्यानी सातत्याने केले आहे. भारताचा इतिहास नव्याने लिहिण्याचीच गरज नाही तर सांस्कृतिक दंतकथाही आम्हाला समजून घ्याव्या लागतील. सुरु होणारा गणोत्सव हा मुळत: आमच्या हिंदु बहुजन संस्कृतिशी जुळलेला आहे. मात्र या महोत्सवाचे स्वरुप आणि रुप ब्राह्मण संस्कृतिने अमुलाग्र बदलुन टाकले आहे. गणपती हा शब्द साधारणत: अडीचहजार वर्षांपूर्वीच्या समाजरचने पर्यंत अस्तित्वात होता. इसवीपूर्व नवव्या शतकात कृष्ण आम्हाला यादव गण म्हणून नेतृत्व करतांना दिसतो. हा गण समाज म्हणजे मुळत: भारतीय असणारा समाज. जो प्रामुख्याने शेती करत होता. शेती करणारा हा समाज गण समाजाचा घटक होता. या गण समाजात शेतीचे समान वाटप करण्याची भूमिका गणाचा प्रमुख निभवित असे. गण समाजाच्या प्रमुखाला गणपात्य किंवा गणपती असेही संबोधले जात असे. नैसर्गिक साधन-संपत्ती विशेषत: शेती ही कुलाच्या सदस्यांना समान पध्दतीने गणप्रमुख वाटत असे. त्यांच्या या भूमिकेमुळे संपुर्ण गणसमाज त्यांच्यावर खूष असे. या गणप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना पुजण्यात येत असे. समाज व्यवस्थेत त्यांनी आर्थिक समतेचा दिलेला वसा हा समाजाला अत्यंत आदरणीय होता. त्यामुळे या आर्थिक समतेला समाजात मोठा वाव होता. गणसमाजाची प्राचिन काळात जी काही भरभराट झाली त्याचे मुख्य कारण हेच होते. गणाचा नायक हा साधारणत: आठ पिढ्यांचे नेतृत्त्व करत असे. आठव्या पिढी नंतर त्या गणातील कुलांचा विस्तार होत असे. त्यामुळे अनेक कुलांचा मिळून एक गण व्हायचा. अशी अनेक गणराज्य त्या काळात आपल्याला दिसतात. जी संघगण म्हणून प्राचिन इतिहासात ओळखली जातात. जनपदे आणि संघगण समाज रचना यापैकी संघगण समाजालाच अधिक प्राधान्य आहे, कारण संघगणाची समाज रचना ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समतेवर आधारलेली आहे. समता निर्माण करणारा आमचा गणनायक हा आमचा मुळ पुरुष आहे. या गणनायकाची पुजाविधी हा बहुजन समाजाचा शेती हंगामाशी निगडीत उत्सव आहे. आजही ग्रामीण भागात आम्ही पाहातो की शेतामधील पहिले पिक श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या उन्हात कापले जाते. त्यामुळे शेतीचा हंगामाचा हा उत्सव आणि शेतीचे हे उत्पादन समान वाटप करणार्‍या गणसमाजाच्या प्रमुखाचा स्मरणाचा हा उत्सव. या उत्सवाला आम्ही मानवी इतिहास म्हणून समजून घेणे गरजेचे आहे. कारण शेतीशी निगडीत असणारा हा उत्सव आमच्याच गणसमाजाने कसा साजरा करायला हवा हे देखिल ठरविणे गरजेचे आहे. गणसमाजाचा घटक असलेला आमचा शेतकरी बांधव दुष्काळाच्या गर्तेत सापडून अनेक संकटांचा सामना करीत आहे. आमच्या या गणबांधवाला वेगवेगळ्या प्रकारची मदत होणे गरजेचे आहे. मात्र त्याचवेळी आम्ही आमच्या गणप्रमुखाच्या ऐतिहासिक उत्सवाला केवळ धार्मिक उधाणाचा रंग देवून आणि वित्तीय साधनांची उधळपट्टी करुन साजरा करण्यात जर गुंतलो तर आम्ही आमच्या मुळ इतिहासाची प्रतारणा करीत आहोत. भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज विद्वानांनी सातत्याने प्रतिपादन केली आहे. लिखित इतिहासापेक्षाही हिंदु बहुजन समाजाचा मौखिक इतिहास फार समृध्द आहे. मात्र या समृध्द इतिहासाला समजून घेण्यात आम्ही गल्लत करीत आहोत. त्यामुळे गणसमाजाचा इतिहास आम्हाला समजून घेणे नितांत गरजेचे आहे. गणसमाज हा मुळ भारतीय समाजाचाच राहीला आहे. आर्य समाज हा बाहेरुन आलेला असल्यामुळे तो गणसमाजाचा घटक कधीही राहीला नाही. मात्र सध्या साजरा केला जाणारा गण उत्सव करण्यात मुळ आर्य असणार्‍या समाजालाच अधिक रस का आहे, हेही आम्हाला समजुन घ्यावे लागेल. आमच्या इतिहासापासुन आमची पाळेमुळे जर आम्ही खुडून टाकली तर आम्ही या देशात उपरे ठरण्याचा धोका निर्माण होईल. आमच्या संस्कृतिमध्ये इतरांनी ढवळाढवळ करावी इतपत ती कमजोर नाही. त्यामुळे गण उत्सव हा मुळ हिंदु बहुजन समाजाचा काय आहे हे माहीत करुन घेणे ही आमची ऐतिहासिक जबाबदारी आहे. या जबाबदारीपासुन आम्हाला मुक्त होता येणार नाही. त्यामुळे मुळत: न्यायी मानव असणारा आमचा गणनायक हा माणूस म्हणून आम्हाला उभा करायचा आहे.