Breaking News

डॉक्टरांच्या मुदतीची मागणी फेटाळून मनपाची कारवाई सोमवारीही सुरूच

अहमदनगर, दि. 08 - शहरातील रुग्णालयाच्या अनधिकृत बांधकामावर मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन दिवसांपासून सुरु केलेली कारवाई सोमवारी सुरूच होती. पार्किंगच्या जागा रिकाम्या करण्यासाठी रुग्णालयांना महिनाभराची मुदत देण्याची मागणी कारवाईदरम्यान डॉक्टरांनी केली. मात्र ती मागणी पथककाने फेटाळून कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितल्याने शंभर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने माजी आ. अनिल राठोड व माजी महापौर भगवान फुलसौन्दर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेउन निवेदन दिले. यावेळी डॉ. दीपक, डॉ. डौले, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वीर, डॉ. कुलकर्णी, डॉ. पाठक, डॉ, शिरसाठ, डॉ. सानप यांच्यासह डाँक्टर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील 52 रुग्णालयांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम सुरु केली. या प्रकरणी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल झाली होती. त्यावर खंडपिठाने, मनपाने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यात 10 ऑगस्ट ही मुदत देण्यात आली. त्यामुळे मनपाने आयुक्तांची बदली झाली असताना व आयुक्तपदाच पदभार घेणारे हजर नसतांना ही कारवाई सुरु केली. आतापर्यंत तर्कपूर परिसरातील पाच ते सहा रुग्णालयावर जेसीबीने बांधकाम पडण्याची कारवाई केली.
शहरातील 121 रुग्णालयांपैकी अनधिकृत असलेल्या 52 रुग्णालयांवर पहिल्या टप्प्यात कारवाई सुरु केली आहे. केवळ दोनच रुग्णालयाकडे पुर्णत्वाचा दाखल आहे. उर्वरित रुग्णालयांना वारंवार नोटिसा दिल्या होत्या. मात्र मनपाकडून कोणतीच कारवाई झाली नव्हती.
पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. कारवाईच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी भेट देउन पाहणी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहणार असलैच त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉक्टर संघटना न्यायालयात जाणार आहे, असे डॉक्टर दीपक यांनी सांगितले.