Breaking News

मिरीत विवाहितेची आत्महत्या; घातपाताचा आरोप

अहमदनगर, दि. 08 - तालुक्यातील मिरीनजिकच्या आडगांव येथील प्रियंका सचिन गुगळे या पंचवीस वर्षीय विवाहितेने घरातील पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून ही आत्महत्या नाही तर  घातपात आहे, असा संशय विवाहितेच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेचा पती सचिन चंदुलाल गुगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  सदर विवाहित महिला 3 मुली आणि पतीसह दोन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत होती. तिचा पती दूध आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर या विवाहितेने तिच्या दोन वर्षांच्या मुलीसमोर गळफास घेतला. पती दूध घेऊन परतल्यानंतर त्याने हा प्रकार शेजारील नागरिकांना सांगितला. दरम्यान, आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून घातपात झाल्याचे संशय विवाहितेच्या नातेवाईकांनी व्यक्त करीत पतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे विवाहितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यांनतर मृतदेह ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली. घराच्या बांधकामासाठी माहेरहून 50 हजार रुपये आणावेत, या कारणासाठी सासरी मुलीचा शारीरिक छळ होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिसांनी पती सचिनविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास राऊत करीत आहेत.