Breaking News

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी ’पीएनजी ज्वेलर्स’ची उत्कृष्ट कलाकुसर!

पुणे, दि. 24, ऑगस्ट - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्त भाविकांनी  सढळ हाताने आणि श्रध्देने अर्पिलेल्या सोन्यातून 40 किलो वजनाचे सुवर्ण अलंकार बनविण्यात आले आहेत. प्रसिद्ध सराफ पेढी असलेल्या पीएनजी ज्वेलर्सतर्फे  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी ही विशेष ज्वेलरी तयार करण्यात आली आहे.
या विशेष ज्वेलरीमध्ये साडेनऊ किलो वजनाचा रत्नजडित सुवर्ण मुकुट, 7 जाळ्या, 700 ग्रॅम वजनाचे सुवर्ण  शृंगार भूषण, सूर्यकिरणाचा आभास निर्माण करणारे 2  किलो वजनाचे सुवर्ण कान, तब्बल 4 हजार सुवर्ण फुलांच्या नक्षीपासून तयार करण्यात आलेला सुवर्णपोषाख, साडेतीन किलो वजनाचे सुवर्ण रत्नजडित उपरणे,  साडेसहा किलो वजनाचे सोवळे आणि पांढर्या रत्नांचे कोंदण असलेला एक किलो वजनाचा सुवर्ण हार, प्रभावळ आदींचा समावेश आहे. या दागिन्यांमध्ये सोने व  मौल्यवान रत्नांचा वापर करण्यात आला आहे. या सर्व दागिन्यांवर 40 कारागिरांनी 5 महिने कलाकुसर केली आहे, अशी माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ, कारागीर शरणकुमार रतकलकर यांनी दिली.