Breaking News

शेवगाव हत्याकांडातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

अहमदनगर, दि. 24, ऑगस्ट - शेवगाव येथील हरवणे कुटुंबियांच्या हत्याकांडातील संशयित आरोपीने नेवासा पोलीस ठाण्याच्या कोठडीत टॉवेलने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. अमोल ईश्‍वर पिंपळे वय-22, गिडेगाव, ता. नेवासा असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपळे  याच्या सबत पोलीस कोठडीत इतर दहा आरोपी होते. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना घटनेची माहिती  समजताच ते घटनास्थळी हजर झाले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन नेवासा पोलीस ठाण्यातील दहा कर्मचार्‍यांची चौकशी सुरु केली आहे. 
दि.17 जून 2017 रोजी शेवगांव येथील आबासाहेब हरवने, त्यांची पत्नी, मुलगा व मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी  म्हणून पिंपळे यांच्यासह पाच आरोपींना पकडण्यात आले होते. दरोड्याच्या उद्देशाने हरवणे कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली होती.  नेवासा हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात अमोल पिंपळे याला पोलिसांनी वर्ग करून घेतले होते. दि.18 ऑगस्टपासून तो नेवासा पोलीस कोठडीत होता. बुधवारी  पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ज्या ठिकाणी अमोल पिंपळेला कोठडीत ठेवले होते, तेथे वेगवेगळ्या गुन्ह्यातील दहा आरोपी  होते. त्यामुळे हा प्रकार कसा घडला, याची पोलिस चौकशी करीत आहेत.