‘आधार’ संलग्न केल्याने ‘गोपनीयते’ला धोका नाही : आधार प्राधिकरण
नवी दिल्ली,दि.2 : आधार क्रमांकावरून संबंधितांची खाजगी माहिती गोळा करणे अशक्य आहे. आधार कार्ड तयार करताना आधारधारकाची खाजगी माहिती गोपनीय राहण्यासाठी त्यात तशाप्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आधार प्राधिकरणाचे प्रतिनिधी तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. आधार कायद्याअंतर्गत माहिती भरताना आधारधारकाची गोपनीय माहिती इतरांना उपलब्ध होऊ नये, यासाठी आधार प्रणालीत विशिष्ट प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या या ‘ऑनलाईन’च्या काळात आधार संलग्न केल्याने गोपनीयतेला धोका असल्याचा बाऊ करणार्यांनी नागरिकांची दिशाभूल करू नये. कारण इंटरनेटच्या वापराने हल्ली इतर काहीही गोपनीय राहत नसले, तरीही आधार संलग्न केल्याने आधारधारकाच्या गोपनीयतेला धोका नाही, असेही मेहता म्हणाले.