अपोलो हॉस्पिटलने नियमानुसार स्थानिकांना रोजगार दिले नसल्यास चौकशी करू : मुख्यमंत्री
मुंबई,दि.2 : बेलापूर येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये स्थानिकांना नियमानुसार रोजगार दिला नसल्यास त्याची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. बेलापूर येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये स्थानिकांना रोजगार व उपचार मिळणेबाबत प्रश्न सदस्य सुभाष पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हॉस्पीटलसाठी जे भूखंड सवलतीच्या दराने देण्यात येतात त्यांना 15 टक्के सवलतींच्या जागांचा नियम लागू आहे आणि हॉस्पीटलने या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी यंत्रणाही कार्यान्वित आहे. मात्र, अपोलो हॉस्पीटलचा भूखंड हा तेथील किंमतीपेक्षा 300 पटीने जास्त किंमत ठेवून लिलाव पद्धतीने देण्यात आला होता. त्यामुळे हॉस्पीटलने वाढीव खाटा देणे आणि सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा देणे कायद्यानुसार बंधनकारक नाही. मात्र, जीवनदायी योजनांचा लाभ रूग्णांना घेता येणार आहे. याचबरोबर स्थानिकांना किती रोजगार मिळाला किंवा नाही याची शहानिशा करण्यात येईल. कौशल्य विकासचे प्रशिक्षण देऊ आणि स्थानिकांना रोजगार देऊ असे हॉस्पीटलच्या संचालकांनी घोषीत केले होते. मात्र तसे घडले नसल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.