Breaking News

कमी पैशात दर्जेदार शिक्षण; महापालिका शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम राबवावे : नितीन गडकरी


नागपूर,दि.2 : ज्ञानार्जनासह व्यक्तिमत्व निर्मिती म्हणजे शिक्षण होय. देशात हल्ली शिक्षण खूप महाग झाले असून या शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास होईलच याची शाश्‍वती नाही. यापार्श्‍वभूमीवर सीबीएसई अभ्यासक्रमातून चांगले शिक्षण मिळते. महापालिका शाळांच्या इमारती नाममात्र दराने उपलब्ध झाल्यास तेथे दर्जेदार सीबीएसई अभ्यासक्रम राबवता येऊ शकत असल्याची अभिनव कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा नंदनपवार यांच्या नागपुरात आयोजित अमृत महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
गडकरी म्हणाले की, शिक्षण या संकल्पनेत प्रशिक्षण, प्रबोधन, संशोधन आणि प्रगती याचा समावेश होतो या गोष्टींची पूर्तता झाली तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल. सीबीएसईचे दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला परवडत नाही. मर्यादित जागांमुळे आमच्याकडे येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला खासदार कोट्यातून प्रवेश मिळवून देणे शक्य नाही. नियमांच्या अडचणी आणि सरकारच्या आर्थिक मर्यादांमुळे आमचाही नाईलाज होतो. तरी देखील शक्य तितक्या मुलांना सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. यापार्श्‍वभूमीवर आपण प्रकाश जावडेकराना मनपा शाळेच्या इमारती नाममात्र दराने उपलब्ध झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत येईल, अशी कल्पना सुचवल्याचे गडकरी यांनी सांगितले.