शाहिद अब्बासी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
इस्लामाबाद,दि.2 : पनामा पेपरलीक प्रकरणी नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडायला लागल्यानंतर या पदाची धुरा कोण संभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शाहिद खाकन अब्बासी यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान पदासाठी झालेल्या निवडणूकीत त्यांना 221 मतं मिळाली आहेत. 58 वर्षीय अब्बासी हे नवाझ शरीफ यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून माजी पेट्रोलियम मंत्री शाहिद खाकन अब्बासी यांची निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदापासून पायउतार व्हावे लागले होते. यांच्यानंतर, पंतप्रधानपदाचे उत्तराधिकारी म्हणून सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीगने (नवाज) शनिवारी त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांची निवड केली. मात्र, पंतप्रधान होण्यासाठी शाहबाज यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर (मजलिस-ए-शूरा) निवडून येणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुमारे दीड महिन्यासाठी शाहिद खाकन अब्बासी यांनी हंगामी पंतप्रधानपद सांभाळावे, असेही पक्षाने ठरविले होते.
पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही. शरीफ यांना पद सोडावे लागले असले, तरी पक्ष त्यांच्या मुठीत असल्याने, तूर्तास अब्बासी व नंतर शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान करण्याचे ठरले होते. पण अब्बासी हेच पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. शाहबाज यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा व आपल्या बंधुंच्या अपात्रतेने रिक्त लाहोरची जागा लढवायची, असे धोरण पक्षाने ठरविले असल्याचे वृत्त आहे.