Breaking News

देशात सध्या अघोषित आणीबाणीची परिस्थिती- प्रकाश अकोलकर

सातारा, दि. 22, ऑगस्ट - वृत्तपत्रात ,प्रसारमाध्यमातून काय लिहावे ? काय प्रसिद्ध करावे ? काय बोलावे याबाबत खरोखरच दहशतीचे वातावरण आहे.  देशात सध्या अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे. यापुढील काळात गप्प बसून चालणार नाही याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन  जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना केले .
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. शेख काका व शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथील पाठक भवन मध्ये जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर  यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांपुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते. परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती आणि  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती , सातारा यांचे वतीने ही अभिवादन सभा आयोजित केली होती अध्यक्षस्थानी सातारा येथील पत्रकार व कार्यकर्ते विजय  मांडके होते. आणीबाणीच्या कालखंडात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला होता पण आताची परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर आहे. प्रचंड दहशतीचे  वातावरण आहे या वाईट प्रवृत्तीविरोधी लढावेच लागेल, असे सांगून प्रकाश अकोलकर यांनी पत्रकारातच भाजप व शिवसेना युतीचे सरकार फूट पाडत  असल्याचा आरोप केला .
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निस्वार्थी कार्याचा गौरवाने उल्लेख करून प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या हत्येचा तपास अद्याप न केल्याप्रकरणी शासनाच्या  निष्क्रियतेचा निषेध केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच सध्या शिल्लक नाही हेच एक मोठे आव्हान असल्याचे विजय मांडके यांनी अध्यक्षपदावरून बोलताना  सांगितले. मयूर खराडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. स्वागत तौसिफ़ शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय  तेजश्री पाटील यांनी करून दिला . आभार रणजित भोसले यांनी मानले. सूत्रसंचालन रखमा हेमा श्रीकांत यांनी केले. शाहीर श्रीरंग रणदिवे व सहकार्‍यांनी  डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यावर आधारित पोवाडा प्रारंभी सादर केला.
यावेळी जेष्ठ विचारवंत डॉ दत्तप्रसाद दाभोलकर, कॉ. सयाजीराव पाटील , कॉ. वसंतराव नलावडे , किशोर बेडकिहाळ , प्रशांत पोतदार , कॉ. शिवाजी पवार  , उदय चव्हाण , वंदना माने , अरुण गोडबोले , प्रा पुरुषोत्तम शेठ , प्रा सुनील गायकवाड , मिनाज सैय्यद , सुनील उबाळे , जयंत उथळे , प्रा. युवराज  जाधव , प्रा. हिंदुराव पवार . प्रा.आर वाय. जाधव यांचेसह अनेक जण उपस्थित होते.