Breaking News

स्तनांच्या कर्करोगाची बायॉप्सी करणे आता घाटीत शक्य


औरंगाबाद,दि.8 
 : पोट,मेंदू आणि इतर कर्करोगाच्या गाठींप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगात अचूक निदान करण्यासाठी सोनोग्राफीच्या माध्यमातून कोअर बायॉप्सी करणे आता शासकीय वैद्यकीय रुग्णालयातही शक्य होणार आहे. यामुळे स्तन कर्करोगाचे अचूक निदान करता येईल, अशी माहिती घाटीच्या किरणोपचारतज्ज्ञ डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी दिली. घाटीच्या रेडिओलॉजी विभागात रविवारी कोअर बायॉप्सी विषयावर झालेल्या कार्यशाळेनंतर त्या बोलत होत्या. पहिल्यांदाच या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. मुंबईच्या एन. एम. मेडिकल सेंटरच्या स्तन कर्करोग क्ष किरण विशेषज्ञ डॉ. शिल्पा लाड यांनी कोअर बायॉप्सीसंदर्भात प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. रोटे म्हणाल्या, कर्करोगाचे निदान करताना आम्ही सुईद्वारे बायॉप्सी करतो. मात्र, अनेकदा गाठीसोबत पाणीसुद्धा असते. सुई जर गाठीतील पाण्याच्या भागात गेली अन्‌ त्याची तपासणी केली तर कर्करोग नसल्याचे निदान होते. अभ्यासात असे लक्षात आले आहे की, अनेकदा यातून अचूक निदान होत नाही. त्यामुळे सोनोग्राफीच्या मार्गदर्शनात केले जाणारे कोअर बायॉप्सी हे तंत्र अधिक प्रभावी आहे. यात विशेष प्रकारची सुई वापरली जाते. यामुळे सोनोग्राफी पाहत गाठीतील नेमका टिश्यूचा भाग काढून तपासता येतो. या तंत्राने केली जाणारी तपासणी 96 टक्के इतकी अचूक ठरली आहे. काय आहे कोअर नीडल बायॉप्सी : यामध्येकर्करोगातील गाठ सुईच्या माध्यमातून काढली जाते. अवघ्या 10 मिनिटांत होणारी ही शस्त्रक्रिया रुग्णाला गुणवत्तापूर्ण उपचार देण्यात प्रभावी ठरली आहे. महिनाभरातथ्रीडी टोमो सिंथेसिसही : 36लाखांची थ्रीडी टोमो सिंथेसिस ही नवी प्रणालीही किरणोपचार विभागात सुरू होणार आहे. यामुळे स्तनाचा कर्करोग अचूक तपासणे अधिक सोपे होणार आहे. घाटीत येणाऱ्या गरजूंसाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरेल.