Breaking News

नागपूरच्या किल्ल्यात टिपूच्या नातवाची कबर; स्वातंत्र्य सैनिकांची समाधी बनली मजार

नागपूर,दि.8  : आपल्या देशात कधी कुठल्या गोष्टीला देवत्व प्राप्त होईल याचा नेम नाही. स्वातंत्र्य सेनानी देखील याला अपवाद नाहीत. इंग्रजांच्या विरोधात १८५७ च्या युद्धात लढणाऱ्या टिपू सुलतानच्या नातवाला नागपुरातील सिताबर्डीच्या किल्ल्यात फाशी दिली आणि तिथेच त्याचे दफन केले. आज त्याच्या समाधीची मजार झाली असून खरा इतिहास मागे पडल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
बंगालच्या समुद्राला हादरा देणाऱ्या रघुजीराजांच्या नागपुरातील किल्ल्यामध्ये शेर-ए-म्हैसूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिपू सुल्तानच्या नातवाची कबर आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील या सेनानीला इंग्रजांनी फाशी देऊन त्याचे पार्थिव किल्ल्यातच दफन केले होते. त्याच्या अंत्यविधीची जागा आज नौगजा पीर म्हणून पूजली जात असून टेरिटोरीअल आर्मी त्याची देखरेख करते आहे. इतिहासाच्या पुस्तकांसह सुप्रसिद्ध साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या प्रथम पुरुषी एकवचनी या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडात त्याचा संदर्भात उल्लेख आहे. मुळची गोंड राजांची राजधानी असलेल्या नागपुरात सुमारे ३०० वर्षांपूर्वी मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. भोसल्यांनीच आपल्या राजधानीच्या संरक्षणासाठी सीताबर्डीच्या किल्ल्याची निर्मिती केली होती. रघुजीराजे भोसले (द्वितीय) यांचे मार्च १८१६ मध्ये निधन झाल्यानंतर राज्य कारभाराची सुत्रे अप्पासाहेब भोसल्यांकडे आली. अप्पासाहेबांचे इंग्रजांशी १८१७ साली भीषण युद्ध झाले होते. यात ब्रिटीश सैन्याच्या २४ व्या रेजिमेंटचा प्रमुख ले. कर्नल स्कॉट याने सीताबर्डीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला होता. त्यानंतर इंग्रजी सैन्याचे वास्तव्य किल्ल्यावर होते. ब्रिटीश सत्तेच्या विरोधात १८५७ साली झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रमात टिपू सुल्तानचा नातू नवाब कादरअली हा सहभागी झाला होता. त्याला अटक करून इंग्रजांनी नागपुरातील सीताबर्डीच्या किल्ल्यावर कैद केले होते. युद्धाच्या गोंधळी वातावरणात नवाब कादर अली आणि त्याच्या आठ सहकाऱ्यांना इंग्रजांनी फासावर लटकवून किल्ल्यातच त्यांचा दफनविधी उरकून टाकला होता. कालांतराने त्यांची समाधी नौगजा पीर म्हणून पूजल्या जाऊ लागली. परंतु, या समाधीत चिरनिद्रा घेणारे कुणी धार्मिक साधू नसून स्वातंत्र्यासाठी लढणारे शिपाई आहेत. पु.भा. भावेंच्या तीन खंडीय आत्मचरित्राच्या पहिल्या भागात (पान क्र.१७०-१७१) याबाबत स्पष्ट उल्लेख आलेला आहे. त्याशिवाय यासंदर्भात इतर दस्तावेज देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे किल्ल्यातील दर्गा हे धार्मिक नव्हे तर क्रांतीस्थळ म्हणून प्रेरणादायी ठरते.