Breaking News

मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा होणार पारंपरिक पद्धतीने

पुणे, दि. 25, ऑगस्ट - लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मानाच्या 5 मंडळांसह सार्वजणनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त सज्ज झाले आहेत. बाप्पाचे  स्वागत जल्लोषात करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. मानाच्या 5 मंडळांच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीनंतर पारंपरिक आणि विधीवत पद्धतीने होणार  आहे.
पहिल्या मानाच्या कसबा गणपतीच्या चांदीच्या पालखीची मिरवणूक सकाळी 8.30 वाजता मंदिरापासून निघणार आहे. त्यानंतर 10 वाजता लोखंडे तालीम येथून  मंदिराच्या दिशेने मुख्य मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीमध्ये देवळणकर बंधुंचे नगारावादन, शिवतेज, श्रीराम ढोल ताशा पथक, प्रभात बँड आदी वाद्यवृदांचा  समावेश असेल. यंदाच्या वर्षी नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. कसबा पेठेतील सभामंडपात मिरवणुकीचा समारोप होईल.  सकाळी 11.33 वाजता सांगलीचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ‘श्री’ ची प्राणप्रतिष्ठा होणार असून राहुल गुरुजी पौरोहित्य करणार असल्याची माहिती मंडळाचे  अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली आहे.
दुसर्या मानाच्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक सकाळी 10.30 वाजता नारायण पेठेतून निघणार असून ती केळकर रस्ता - कुंटे चौक -  लक्ष्मी रस्ता - गणपती चौक मार्गे जोगेश्‍वरी चौकातील सभामंडपात येणार आहे. या मिरवणुकीत आढाव बंधू नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा, ताल  डोल-ताशा पथकांचे वादन असेल. यंदाच्या पुजेचा मान व्यावसायिक समीर शाह यांना देण्यात आला आहे. दुपारी 1.15 वाजेपर्यंत ‘श्री’ ची प्राणप्रतिष्ठा करण्यात  येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली आहे.
तिसर्या मानाच्या गुरुजी तालीम गणरायाच्या मिरवणुकीस सकाळी 10 वाजता गणपती चौकातून प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक लिंबराज चौक - आप्पा बळवंत  चौक - जोगेश्‍वरी चौक - बुधवार चौक - बेलबाग चौक - गणपती चौकातून मंडळाच्या मंडपात येणार आहे. मिरवणुकीमध्ये महिलांचे नादब्रम्ह ढोल-ताशा पथक  अग्रस्थानी असणार आहे. त्यानंतर गर्जना, शिवगर्जना, गुरुची प्रतिष्ठान या ढोल पथकांचा समावेश असेल. मिरवणुकीसाठी सुभाष सरपाळे यांनी फुलांचा रथ सजविला  असून रथातून बाप्पांची मिरवणुक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत अभिनेता अर्जुन रामपाल सहभागी होणार आहे. तर 12.45 वाजता ‘श्री’ ची प्राणप्रतिष्ठा  होणार असून यंदाच्या पुजेचा मान उद्योजक सुकेन शहा यांना मिळाला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी यांनी दिली आहे.