Breaking News

मागील वर्षाच्या तुलनेत टँकरसाठी 263 कोटी 47 लाख कमी खर्च

मुंबई, दि. 25, ऑगस्ट - जलयुक्त शिवार योजनेत गेल्या तीन वर्षात राज्यात तीन लाख 95 हजार कामे झाली आहेत. जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या उत्तम  कामगिरीमुळे यावर्षी पाणी टंचाई तुलनेने कमी जाणवली. त्याचा परिणाम म्हणून टंचाईग्रस्त गाव-वाड्या वस्त्यांसाठी कमी टँकर लावण्यात आले. गेल्या दोन वर्षाच्या  तुलनेने यावर्षी लावण्यात येणार्‍या टँकरची संख्या कमी झाली. पर्यायाने टँकरसाठी लागणार्‍या खर्चात कपात झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेने जवळपास 263  कोटी 47 लाख 90 हजार इतका कमी खर्च झाला आहे.
मागील दोन वर्षात राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठ्यासाठी वापरात आलेल्या टँकरची संख्या होणारा खर्च याची माहिती पुढीलप्रमाणे. ऑक्टोबर 2014 ते  जून 2015 या टंचाई कालावधीत 2 हजार 378 गावे, 3 हजार 263 वाड्या यासाठी 2 हजार 772 टँकर लावण्यात आले. त्यासाठी 75 कोटी 67 लाख 72  हजार रुपये इतका खर्च झाला. ऑक्टोबर 2015 ते जून 2016 या कालावधीत 4 हजार 989 गावे, 7 हजार 939 वाड्यांसाठी 6 हजार 140 टँकर लावण्यात  आले. त्यासाठी 315 कोटी 17 लाख 43 हजार रुपये इतका खर्च झाला. ऑक्टोबर 2016 ते जून 2017 या कालावधीत 1 हजार 798 गावे, 4 हजार 281  वाड्यांना 1 हजार 666 इतके टँकर लावण्यात आले. तर यासाठी 51 कोटी 69 लाख 53 हजार इतका खर्च झाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास  रु. 263 कोटी 47 लाख 90 हजार इतका कमी खर्च झाला आहे.