Breaking News

पिंपरीच्या तरुणीने पटकावले मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेचे विजेतेपद

पुणे, दि. 28, ऑगस्ट - पिंपरीच्या शिब्रा तुपके या तरुणीने थायल नुकत्याच पार पडलेल्या मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे  पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.पिंपरीतील नेहरुनगर येथील मगर स्टेडियम जवळ राहणा-या शिब्राचे शालेय शिक्षण  पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ती सध्या पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षाला शिकत  आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असली तरी मॉडेलिंग विश्‍वात तिला करिअर करण्याची रुची होती. 2015 पासूनच तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. 
मिस आशिया पॅसिफिक या स्पर्धेपूर्वी अशा प्रकारच्या 8 ते 10 स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला होता. यापैकी मिस सिंहगड करंडक, फ्रेश सेस या पुणे जिल्हा  पातळीवरील स्पर्धेचे टायटल तिने आपल्या नावावर केले. त्यानंतर द फिटनेस क्वीन व नॅशनल मिस ग्लोबल इंडिया, असे दोन्ही राष्ट्रीय पातळीवरील टायटलही  जिंकले. या स्पर्धांमधील विजयाने शिब्राला मोठा आत्मविश्‍वास मिळवून दिला. मात्र, अद्यापही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा मिस  आशिया पॅसिफिक या स्पर्धेने पूर्ण केली, असे शिब्राने सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर परफॉर्मन्स करताना तुम्हाला तुमच्या नावाने नव्हे तर भारताच्या नावाने तुम्हाला पारखले जाते. त्यामुळे ही स्पर्धा माझ्यासाठी खूप  आव्हानात्मक होती. कारण यामुळे जबाबदारी वाढते. स्पर्धेतील प्रत्येक फेरीला अगदी विचारपूर्वक परफॉर्मन्स देत गेले. कोणतीही गोष्ट अतिरंजित वाटणार नाही याची  काळजी घेतली. स्पर्धेच्या रॅम्प वॉक, टॅलेंट राऊंड, फोटोशूट प्रत्येक ठिकाणी मी हायस्कोर नोंदवला. मात्र स्पर्धेतील प्रश्‍नोत्तराचा राऊंड निर्णायक ठरला.
शिब्राला सध्या एका तेलगू चित्रपटाची ऑफर आहे. यावर मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का, असे विचारल्यावर मराठी चित्रपटात नाव गाजवायला मला  निश्‍चितच आनंद होईल, असेही शिब्राने सांगितले. शिब्राची आई गृहिणी असून तिचे वडील आयटी रिक्रुटमेंट फर्ममध्ये काम करतात. तर लहान बहीण सध्या दहावीला  आहे. आई देखील उच्चशिक्षित असून केवळ आमच्या करिअरसाठी तिने तिचे जॉब सोडले आहे. त्यामुळे आपल्या या यशात आई व कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे.  किंबहुना आईने सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळवता आले, असेही शिब्राने सांगितले.