Breaking News

‘एलपीजी’ अनुदान बंद करण्याचा निर्णय गरीबांना घातक ; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल


नवी दिल्ली, दि.2 : घरगुती गॅसवरील (एलपीजी) अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करणे आणि सिलिंडरच्या किमती दरमहा वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा गरिबविरोधी आहे, अशा शब्दांत विरोधकांनी मोदी सरकारवर राज्यसभेत हल्ला चढवला. सिलिंडरच्या किमती वाढवण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी एकत्र येऊन राज्यसभेत सरकारवर हल्लाबोल केला. ‘जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या दरात घट झाली असताना भारतात मात्र घरगुती गॅसच्या किमतीत वाढ होणे हे दुर्दैवी असून सरकार बोलते एक आणि करते काही वेगळेच!, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी केला. या मुद्द्यांवरून झालेल्या गोंधळामुळे आज राज्यसभेतील प्रश्‍नोत्तराच्या तासात कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. सरकारने एकीकडे घरगुती गॅसवरील अनुदान बंद करण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीत मात्र 4 रूपयांनी वाढ केली आहे. दरवाढीच्या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना पुन्हा चुलीकडे वळावे लागेल, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोने व्यक्त केले आहे. काँग्रेसनेही दरवाढीचा निर्णय हा गरीबविरोधी असल्याचे सांगितले आहे.