आजी- माजी नगरसेवकांच्या गटातील मारामारी पाच जखमी
परभणी, दि. 23, ऑगस्ट - सेलु शहरात आजी-माजी नगरसेवकांच्या गटात जुन्या वादावरून आज मंगळवारी सकाळी झालेल्या हाणामारीत पाचजण जखमी झाले असून त्यातील दोघेजण गंभीर जगमी आहेत. शिवाजीनगर येथील विद्यमान नगरसेविका उषा दौड आणि माजी नगरसेविका मंगल कथले यांच्या समर्थक गटात नेहमी कुरबुरी चालतात मात्र आज जुन्या वादावरून सुरू झालेल्या भांडणाने गंभीर रूप घेतले आधी बाचाबाची झाली आणि नंतर मात्र लाठ्या, काठ्या, चाकूने हाणामारी झाली. यात दोन्ही गटाचे मिळून पाचजण जखमी झाले आहेत. दिलीप दौड, योगेश कथले, बबन दौड, रमेश दौड,आश्विन सासवडे ही जखमींची नावे आहेत.या पैकी योगेश कथले आणि बबन दौड यांना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. दोनही गटाने पोलिसात परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे.