Breaking News

कोकणातील शेती तोट्याची नसून फायद्याची - खासदार विनायक राऊत

रत्नागिरी, दि. 23, ऑगस्ट - कोकणातील शेती तोट्याची नसून फायद्याची आहे. परंतु त्याकरिता शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येणारी  संकल्प से सिद्धी योजनाही राबविली गेली पाहिजे. या योजनेचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी कृषी विद्यापीठांतून शेतकर्‍यांना अत्याधुनिक शेतीचे ज्ञान  द्यावे. तसेच कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
देवधे (ता. लांजा) येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दापोली कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ.  संजय भावे यांनी भूषविले. यावेळी श्री. राऊत म्हणाले, शेतकर्‍यांनी शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे बनले आहे. कृषी विद्यापीठाने विकसित  केलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंबन केल्यास शेतकर्‍यांना त्यापासून शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते.
केंद्र शासनाने तयार केलेली प्रोत्साहनपर चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. तसेच नवभारताची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद  अध्यक्षा स्नेहा सावंत, लांज्याच्या सभापती दीपाली दळवी, नगराध्यक्ष सुनील कुरुप, जिल्हा अधीक्षक शिवाजी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाला लांजा, राजापूर, संगमेश्‍वर, रत्नागिरी व साखरपा येथील शेतकरी उपस्थित होते.