Breaking News

स्वाभिमानींची बिकटवाट !

दि. 09, ऑगस्ट - शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हटले की, डोळयांसमोर येतो, संघर्ष, शेतकर्‍यांसाठी रांगडया पध्दतीने आंदोलने करत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी शेतकरी संघटना. मात्र अलीकडच्या काळात सत्तेची झूल अंगावर घेत, शेतकर्‍यांचे आंदोलन करणे म्हणजे संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा देखील द्धिधापरिस्थिती. संघटनेची ताकद वाढवायची असेल, तर शेतकर्‍यांसोबत राहणे गरजेचे. अशात शेतकर्‍यांसोबत राहिलो, तर सरकारसोबत असल्यामुळे मर्यादा येतात, अशा साप शिडीच्या खेळातून स्वाभिमानी संघटना जात आहे. 
स्वाभिमानी ला सत्तेच्या जवळ जाणे, परवडणारे नाही, हे एव्हाना कळून चुकले असेलच. सत्तेच्या हव्यासापायी, संघटनेत उभी  फूट पडली. स्वाभिमानीचे दोन  आधारस्तंभ, म्हणजेच राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत. मात्र दोन खांबातच उभी फुट पडल्यामुळे शेतकरी संघटनेत उभी उभी फुट पडणार हे गृहीतक आहे.  स्वाभिमानीतील फुट सत्ताधार्‍यांच्या पथ्यावर पडली असून, यापुढे शेतकर्‍यांच्या संघर्ष जोमाने पुढे नेणारी संघटना एकत्र नसल्याची खंत शेतकर्‍यांना भासणार हे नक्की.  सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर खोत यांच्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल झाला. शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्‍नांत आघाडीवर असणारे, उत्तम संघटन  कौशल्य असणारे, सदाभाऊ यांचा सत्ता सुंदरीचा मोह नडला. सदाभाऊ सत्तेत असल्यामुळे सदाभाऊंना अनेक मुंगळे चिकटले, तसेच सत्तेत रमाणारे कार्यकर्ते  सदाभाऊभोवती जमा झाले. आणि त्यांची शेतकर्‍यांच्या प्रतीअसलेली बांधीलकी, तुटत चालल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळेच त्यांची गच्छंती अटळ होती.  सदाभाऊ यांच्यावर एका महिलेने केलेले आरोप अत्यंत, खालच्या थरांचे होते, त्यामुळे सदाभाऊ यांच्या नैतिकेतवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असतांना  शेतकर्‍यांच्या संप फोडण्याचे पातक देखील सदाभाऊंच्या माथी जमा झाल्यामुळे, त्यांची पुढील राजकीय वाटचाल खडतर असणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.  सदाभाऊ काही मंत्रिपदांचा राजीनामा देणार नाही, कारण पुढील पंचवार्षिक निवडणूकांनंतर देखील आपण कॅबिनेट मंत्री असून, अशी स्वप्ने सदाभाऊंना पडू लागली  आहे. त्यामुळे सत्तेच्या या सारीपाटात सदाभाऊंचा राजकीय वापर होणार की त्यांचे पुनर्वसन होणार, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलच. मात्र स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे पुढील भविष्य काय? यावर देखील राजू शेट्टी यांनी विचारमंथन करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांचा सरकारविषयी असलेला तीव्र रोष लक्षात घेता,  स्वाभिमानी संघटनेने सत्तेत सहभागी राहणे, संघटनेसाठी आणि शेतकर्‍यांसाठी भूषणावह नाही. असे असतांना चळवळीची विश्‍वासार्हता टिकविणे, हे राजू शेट्टी यांच्या  हातात आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांनी बिकट स्वरूप धारण केले आहे. अशावेळेस शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांप्रती राष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याचे काम राजू शेट्टी यांच्या  शिरावर आहे. सदाभाऊ यांच्या हकालपट्टींनतर संघटनेत फूट पडण्याचे संकेत आहेत. कारण सदाभाऊ आपले पुनवर्सन करण्यासाठी जरी भाजपाच्या कळपात  दाखल होणार असले तरी, त्यांना संघटनेशिवाय चैन पडणार नाही. त्यामुळे सदाभाऊ संघटनेतील कार्यकर्ते घेवूनच नवीन संघटना काढतील यात शंका नाही. तसेच  सदाभाऊ सत्तेत असल्यामुळे अनेक कार्यकर्ते आमिषाला बळी पडून सदाभाऊ यांच्या पाठीशी उभे राहू शकतात. अशावेळेस संघटनेत दुफळी माजणार नाही, यासाठी  राजू शेट्टी यांना कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देऊन त्यांना सक्रिय ठेवण्याची गरज आहे. राज्यात शेतकरी संघटना आता तशा प्रभावी  राहिल्या नाही. आणि येणार्‍या काळात शेतकर्‍यांचे प्रश्‍नांत वाढच होणार आहे, अशावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सक्रियता आणि एकजुट शेतकर्‍यांसाठी  दिलासा ठरणार आहे.