Breaking News

लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून राज्यातील शंभर अंगणवाड्या दत्तक


पुणे,दि.2  : महाराष्ट्रातील अनेक आदिवासी भागात कुपोषणामुळे बळी जाणार्‍या चिमुकल्यांची संख्या वाढत आहे. तसेच अनेकदा खेडोपाड्यात गर्भवती महिलांना पोषक आहार न मिळाल्यामुळे जन्मलेली मुले कुपोषित असतात. त्यामुळे अशा मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि प्राथमिक शिक्षणासाठी तसेच गर्भवती महिलांच्या आहार जनजागृतीसाठी लायन्स क्लबने पुढाकार घेतला आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनलने राज्यभरातील शंभर अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. याशिवाय
महाराष्ट्रातील गर्भवती महिलांसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांचा शुभारंभ नुकताच झाला. लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे डेक्कन महाविद्यालयाजवळील डेक्कन कन्व्हेन्शन सेंटर येथे पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध खेड्यातील 100 अंगणवाडी दत्तक योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य शासन अंगणवाडी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय क्षीरसागर , लायन्सचे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर गिरीष मालपाणी, माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रविण छाजेड, नरेंद्र भंडारी, रमेश शहा, ओमप्रकाश पेठे, राज मुछाल आदी मान्यवर उपस्थित होते. राज मुछाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. विजय क्षीरसागर म्हणाले, अंगणवाडी, बालवाडीमधील मुलांच्या शारीरिक विकासाकरीता त्यांना पोषक अन्नपुरवठा केला जातो. परंतु मुलांच्या शारीरिक विकासाबरोबर त्यांचा बौद्धिक विकास देखील होण्याची गरज आहे. त्याकरिता अंगणवाडीमध्ये विविध बौध्दिक खेळ घेतले पाहिजेत. आजही अनेक खेडेगावांमध्ये कुपोषणामुळे मुलांचा बळी जात आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना मदत करण्याची गरज आहे. गिरीष मालपाणी म्हणाले, क्लबतर्फे दत्तक घेण्यात आलेल्या शंभर अंगणवाडयांमध्ये मुलांना पोषक आहार व औषध पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच शालेय साहित्य, सौरदिवे, स्वच्छता गृह, मुलांना खेळण्यासाठी विविध बौध्दिक खेळ देण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील गर्भवती महिलांकरिता जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम क्लबतर्फे राबविण्यात येणार आहेत.