Breaking News

तस्लीमा नसरिन यांच्या न झालेल्या औरंगाबाद दौर्‍यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्‍न चिन्ह उपस्थित

औरंगाबाद,दि.2  : आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या सुधारणावादी लेखिका तस्लीमा नसरिन यांचा खाजगी दौरा जाहिर कसा झाला? तस्लिमा यांचे नाव बदलून येथील ताज हॉटेलमध्ये बुकींग करण्यात आले असताना त्याच हॉटेलमध्ये त्या उतरणार असल्याचे नेमके काही जणांना कसे समजले? असे अनेक प्रश्‍न तस्लिमा यांच्या न झालेल्या औरंगाबाद दौर्‍यामुळे एकूण सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण करणारी ही घटना ठरली आहे. 
बांगलादेशमधील लेखिका तस्लीमा नसरीन शनिवारी रात्री औरंगाबादला आल्या होत्या. तस्लीमा यांना त्यांच्या प्रवासात सुरक्षा दिली जाते.त्या प्रमाणे त्या कोणत्या विमानाने येणार किती वाजता उतरणार त्यांच्याबरोबर कोण आहेत याची माहिती, तसेच त्या कोणत्या हॉटेलात उतरणार आहेत याची माहिती प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलिसांकडे आली होती. दिल्ली पोलीसांनी 27 जुलै रोजी औरंगाबाद पोलिसांना तस्लिमा यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते. सावधानता म्हणून हॉटेलचे बुकिंगही दुस-या नावे करण्यात आले होते. ही माहिती पोलिसांशिवाय इतर कोणाला समजू नये याची दक्षता घेण्यात आली असताना ती जाहिर झाली. आणि ती शहरात इतरांपेक्षा आधी एमआयएमला समजली. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पोलीसांना तस्लीमा यांना शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, प्रेषितांबद्दल अपशब्द लिहिणा-या या लेखिकेला शहराच्या पवित्र भूमित पाय ठेवता येणार नाही, असा चक्क इशारा दिला त्यानंतर अवघ्या काही काळात रात्री ताज व विमानतळा भोवती एमआयएमच्या तरूणांनी तस्लिमा चले जाव अशा घोषणा सुरू केल्या. रात्री तस्लिमा विमानतळावर आल्या तेव्हा त्या आनंदी आणि निवांत होत्या आपल्या पाल्याला जगप्रसिध्द अजिंठा आणि वेरूळ लेण्या दाखवत तीन दिवसांचा निवांत दौरा करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र विमातळावर त्यांचा विरस झाला .पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी तस्लिमा यांची भेट घेतली आणि तुम्हाला शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे त्यांना सांगितले. त्या वेळी त्यांनी आपला नियोजित दौरा गुप्त असल्याचे पोलिसांना शांतपणे सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना तुमचा दौरा गुप्त राहिलेला नाही. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तुम्ही शहरात आल्या तर तो वाढेल तुम्ही परत जा असे सांगून त्यांच्या परत जाण्याची सोयही विमान व्यवस्थापनातर्फे करवण्यात आली.मात्र तस्लिमा यांच्या न झालेल्या या दायामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षे बाबत प्रश्‍न निर्माण झाले आहेत.त्यांच्या दौ-याची गुप्त माहिती बाहेर कशी आली या प्रश्‍नाचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर असून असे जर घडत राहिले तर अशाच महत्वाच्या इतर गुप्तता बाळगण्याच्या विषयातही सुरक्षेचा खेळ होण्याचा धोका असल्याची चर्चा असून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.