शासनाकडून मदतीऐवजी शेतकर्यांची थट्टा दुष्काळी भरपाई 80 ते 500 रुपये !
सोलापूर,दि.2 : दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे अडचणीत असलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाकडून झाले. जिल्ह्यात 2015-16 मध्ये रब्बी हंगामातील पीक जळून गेले. या नुकसानीपोटी शासनाने विमा कंपनीने दिलेल्या मदतीच्या निकषावर नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. यानुसार जिल्ह्यातील 75 हजार 74 शेतकर्यांना 80 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत मदत देण्यात येत आहे. ही मदत देऊन शासनाने एकप्रकारे शेतकर्यांची थट्टाच केली आहे. शासनाने ज्या निकषावर रब्बी हंगामातील पिकांना नुकसानभरपाई जाहीर केली आहे, तो निकषच चुकीचा ठरला आहे. कारण विमा कंपनीने जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना मंडलनिहाय वेगवेगळे दर ठेवल्याने त्याचा परिणाम शेतकर्यांना मदत देण्यावर झाला आहे. मोहोळ तालुक्यातील उदाहरण पाहता नरखेड मंडलमध्ये कोरडवाहू ज्वारीसाठी हेक्टरी 2827 रुपये दर दिला आहे तर पेनूर मंडलमध्ये हेक्टरी 322 रुपये दर दिला आहे. मोहोळ मंडलमध्ये हरभरा पिकासाठी हेक्टरी 1127 रुपये दर दिला आहे तर कामती बु. मंडलमध्ये 3508 रुपये दिला आहे. बागायती ज्वारीच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळण्यावर परिणाम झाला आहे.