Breaking News

नागपुरात 5 वॉटर एटीएमचे लोकार्पण; ग्रामीण भागात मिळणार शुद्ध पाणी

नागपूर, दि. 22, ऑगस्ट - नागपूर जिल्ह्यातील पाच वॉटर फिल्टर एटीएमचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. रनाळा,  येरखेडा, दिघोरी, महालगाव आणि कामठी या पाच गावांमध्ये हे वॉटर एटीएम सुरू करण्यात आलेत.
याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, विविध आजारांचे मूळच दूषित पाणी आहे. शुध्द पाणी पिण्यास मिळाले तर 90 टक्के साथीच्या आजारांचे प्रमाण कमी होते.  त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीच देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातूनच ग्रामीण भागात वॉटर एटीम  मशीन लावण्याचे काम करण्यात येतेय. गावागावात वॉटर एटीम फिल्टर मशीन लावणे आवश्यक आहे. 20 रुपये लिटरप्रमाणे मिळणार्या मिनरल वॉटरसारखे  शुध्द पाणी या जलशुध्दीकरण केंद्रांतून लोकांना मिळणार आहे. 5 रुपयांमध्ये 25 लिटर पाणी प्रत्येकाला मिळेल. स्वयंपाक आणि पिण्याच्या पाण्यासाठी  नागरिकांना या पाण्याचा उपयोग करावा. त्यामुळे आरोग्याच्या सर्व तक्रारी संपणार आहे. ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ करण्याचा शासनाचा हा प्रयत्न असून  ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याच्या अधिक वितरण केंद्रांच्या उभारणीसाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी  यावेळी केली. सामाजिक बांधिलकी उपक्रमातून वॉटर एटीएम उभारण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.